मुंबई : दिंडीत वाहन घुसून जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) धावून आले आहेत. जखमी झालेल्या वारकऱ्यांशी एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथील आमदार अनिल बाबर (Anil Babar) यावेळी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील केरेवाडी फाट्याजवळ पंढरपूरला एकादशीसाठी पायी चालत चालत असलेल्या वारकरी दिंडीमध्ये समोरून अचानक चार चाकी पिकअप गाडी घुसली. चारचाकी पिकअप गाडी घुसल्याने झालेल्या या अपघातामध्ये अंदाजे 12 वारकरी गंभीर जखमी (Seriously injured) असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या वारकऱ्यांची शिंदे यांनी विचारपूस केली. तसेच त्यांना दिलासा दिला. सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन यावेळी एकनाथ शिंदे यांनी जखमी वारकऱ्यांना दिले.
या अपघातानंतर कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयातून गंभीर जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी 108 रुग्णवाहिकांमधून मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या जखमी वारकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. कशी तब्येत आहे. डॉक्टरांशी माझे बोलणे झाले. सर्वांनी काळजी घ्यावी. कोणतीही मदत असल्यास त्वरीत कळवावे. ट्रीटमेंट चांगली व्हायला हवी, असे वारकऱ्यांशी बोलताना त्यांनी दिलासा दिला.
पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत ब्रेक फेल झालेले चारचाकी वाहन घुसले. त्यामुळे वयोवृद्ध वारकरी गंभीर जखमी झाले. सध्या मिरजमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी रुग्णालयात एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी वारकऱ्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या वारकऱ्यांना संवाद साधता आला. एकूण 17 जखमी वारकऱ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. आषाढी एकादशी आता जवळ येवून ठेपली आहे. रविवारी हा सोहळा साजरा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच अपघाताची घटना घडल्याने आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन आषाढी एकादशीच्या दिवशी या वारकऱ्यांना घेता येणार नाही. त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतरच ते पंढरीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतील.