टीव्ही९ मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडत रडत येत भाजपकडून आपल्याला अटक होणार असल्याची सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी रडणारा नाही लढणारा असून पोराठोरांचे काय प्रश्न विचारता असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मी रडणारा नाही लढणारा एकनाथ शिंदे आहे. मागचा पुढचा विचार केला नाही, सत्तेतून पायउतार होऊन बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सगळं सोडलं. त्यामुळे पोराठोरांचे काय प्रश्न विचारता. आयुष्यभर रडगाणं त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं. बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी आमच्यावर संस्कार केले आहेत. त्यामुळे कुठे थांबायचं, वैयक्तिक कोणाचं काय हे आम्ही सर्व पाहतो. याचा अर्थ कोणी वेगळा काढू नये, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं की, एक शब्दात तुमचा कार्यकाल लोकांनी का लक्षात ठेवावा हे एका वाक्यात सांगावं. यावर बोलताना, कॉमनमॅन आणि इन्फ्रामॅन, अॅक्सेसिबिलिटी, सिम्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी ही माझी ओळख असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
मागील अडीच वर्षाच्या काळात आम्ही अनेक प्रकल्प लोकार्पित केले त्याचा फायदा लोकं घेत आहेत. कोणतेही काम होणार नाही हा शब्द आमच्या डिक्श्नरीमध्ये नाही. तुमच्याकडे पॉझिटिव्ह व्हिजन असायला पाहिजे तरच आपण पुढे जावू शकतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत बसल्यावर बाहेर आल्याव उलट्या होतात असं विधान केलं होतं. यावर बोलताना, आमच्या मंत्री महोदयांनाही मी सांगितलं, आपण महायुतीमध्ये आहोत. महायुतीत बेबनाव होईल, असं कुठलंही वक्तव्य करता कामा नये. महायुतीत भांड्याला भांडं लागतं. कुटुंबातही कधीकधी मतभेद होतात छोट्या-मोठ्या कुरबुरी आहेत त्या मिटून जातील असं शिंदेंनी सांगितलं.