मुंबई : गुजरात निकालानं आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तसंच बाळासाहेबांच्या शिवसेनेला मोठं यश मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आणि देवेंद्र फडणवीस यांना शाबासकी दिली. समृद्धी महामार्ग हा गेम चेंजर प्रकल्प आहे. राज्याचा हिताचा प्रकल्प आहे. त्यामुळं पंतप्रधान मोदी यांना ते काम आवडलं. समृद्धी महामार्गाचा प्रकल्प यशस्वीपणे आम्ही राबविला. म्हणून पंतप्रधानांनी शाबासकीची थाप पाठीवर मारली.
पंतप्रधानांच्या शाबासकीमुळं आनंद झाला. केलेल्या कामाचं समाधान आहे. शाबासकी मिळणं हे आमच्यासाठी गौरवाची बाब असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यपाल असताना आपण पवित्र ठिकाणी व्यक्तिश: गेल्याचं कोश्यारी यांनी म्हटलं. आपली विधानं ही मोडतोड करून दाखविली जातात. त्याबाबत विरोधी पक्ष राजकारण करतोय, अशा भावना राज्यपालांनी पत्राद्वारे व्यक्त केल्यात. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यपाल शिवनेरी, रायगड या किल्ल्यांवर स्वतः गेलेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीलं. त्यात त्यांनी म्हटलं, माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवलं केलं. आधी महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत होतो. हे सारे आदर्श आहेतच. पण, युवा पिढीतील वर्तमानात आदर्श भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा हेसुद्धा कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श राहू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचासुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो. याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा होत नाही, असं कोश्यारी यांनी पत्रात म्हटलंय.