मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, दिवाळीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा आशीर्वाद घेऊन आम्ही पाऊलं टाकलं. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही सांगितलं की, राज्यातील सरकार सर्व सामान्यांचं आहे. मला आनंद होतोय आमची वाटचाल चांगली सुरु आहे. आमचा हेतू लोकांच्या भल्याचा आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मरगळ झटकून कामं सुरु झालीत. चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न केलाय.
लवकरच पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु होईल. पोलिसांच्या घरासाठी निर्णय घेतला. आरोग्यासाठी दुप्पट निधी देण्याचा प्रयत्न केला. आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचवण्याचा निर्णय घेतला. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लवकरच शुभारंभ होईल. सर्वांगीण विकासाचा ध्यास आम्ही घेतलाय, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यातील 15 हजार विद्यार्थांना रोजगार देण्यासाठी आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सशी करार केलाय. मुंबईत मेट्रोचं जाळं वाढवण्याचा प्रयत्न करतोय. नवी, मुंबई ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्र ते गोवा नवा इकोनॉमिकल कॉरिडोअर सुरु करतोय. विविध कार्यक्रमांना गती देण्याचा प्रयत्न करतोय, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईतील सहाशे किमीचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करतोय. राज्यात 9 लॉजिस्टीक पार्क उभारण्याचा संकल्प केलाय, असं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बक्षिसांच्या रकमेत पाचपट वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यातले खेळाडू राष्ट्रीय पातळीवर तयार होतील. उद्योग, पर्यटन, आरोग्य, शिक्षण अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील कामांना गती देतोय. योजना, प्रकल्प यामध्ये सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व उमटेल, याचा प्रयत्न करतोय, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.