मुंबई : उद्या १७ जुलैपासून राज्यातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही चांगले काम करतोय. पण, ज्याला पोटदुखी होईल. त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढून ठेवलाय, असा टोला विरोधकांना लगावला.
शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम सुरूकेलाय. लोकं बघतात. शासन आपल्या दारी दाखवलं तर लोकं बघतील. सकाळचा भोंगा दाखवला तर लोकं कमी बघतील. अशी टर संजय राऊत यांच्या सकाळी बोलण्यावर उडवली. लोकांना कुठल्या योजना मिळतात. हे लोकांपर्यंत पोहचत आहेत. ७० लाख लोकांना शासन आपल्या दारी ही योजना पोहचली.
शासनाने लोकांपर्यंत जावे, असं बाळासाहेब ठाकरे सांगत होते. त्यामुळे लोकांपर्यंत जायला आम्हाला काही कमीपणाचे वाटत नाही. लाभार्थ्यांना लागणारी कागदपत्र देतो. तुम्ही लोकांच्या घरी किंवा दारी जात नव्हते. त्यामुळे तुम्हाला कसं त्याचं महत्त्व कळणार, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
आरोपाला आम्ही कामाने उत्तर देतो. कामाला आणखी गती लागेल. कमी कालावधीत जास्त काम करायचे आहे. आधी दोघे होतो. आता तिघे झालो आहोत. अजित पवार हे पाठपुरावा चांगले करतात. त्यामुळे कामाला अधिक गती येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
विमानतळाचा विकास करत आहोत. सहकार क्षेत्रातील अडचण आली तेव्हा अमित शहा यांनी १० हजार कोटींचा आयकर वाचवला. राज्याच्या हितासाठी आपल्याला गेले पाहिले, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.