मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेसाठी जीवाला जीव दिला. कष्ट केले. प्रसंगी स्वतः जीव धोक्यात घातला. घरादाराची पर्वा केली नाही. कितीतरी खून झाले. या शिवसेनेसाठी कितीतरी लोकं जेलमध्ये गेले. तेव्हा तुम्ही कुठे होता. किती केस झाल्या तुमच्यावर. असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. हा एकनाथ शिंदे आज शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला. यामागे कष्ट, मेहनत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि तुमच्या सगळ्यांची साथ सोबत आहे.
मला आठवते. श्रीकांत डॉक्टर झाला. एमएस झाला. तो म्हणाला, मला हॉस्पिटल करून द्या. पण, त्याचा बाप त्याला हॉस्पिटल करून देऊ शकला नाही. कारण कुठलीतरी निवडणूक यायची. ते राहून जायचं. एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणुका लढवल्या. निवडून आल्यानंतर मातोश्रीवर जायचो.
शिवसेनेसाठी मिळेल ते काम केले. वयाच्या २१ व्या वर्षे ४० दिवस बेळगावच्या जेलमध्ये गेलो. माझ्यासोबत असलेल्या नेत्यांनी तेच केले. म्हणून शिवसेना मोठी झाली. पुढे गेली.
लोकसभेची निवडणूक होती. आई रुग्णालयात उपचार घेत होती. डॉक्टरचा फोन आला. माझ्या बाजूला लोकसभेची उमेदवार गावीत होते. आईचा जीव गेला. तरीही सभा पूर्ण करून आलो. आईचे अंतीम दर्शन घेतलं. अशा अनेक जीवनात प्रसंग आले. असं सांगताना एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते.
अडीच वर्षात जेवढ्या सह्या झाल्या नव्हत्या. तेवढ्या सह्या एका दिवसात केल्या. कारण अगोदरचे मुख्यमंत्री पेनच ठेवत नव्हते. माझ्याकडे दोन-दोन पेन आहेत. हा मुख्यमंत्री गाडीत सही करतो. रस्त्यावर सही करतो. मंत्रालयात सही करतो. ठाण्यात सही करतो.
मुख्यमंत्री साह्यता निधीचे अडीच वर्षात दोन कोटी वाटले होते. या पठ्ठ्याने एका वर्षात ७५ कोटी वाटले. अरे त्याचा जीव वाचवा. एका मुलाचे दोन्ही पाय गेले होते. एक हात गेला होता. त्याला मदत मिळाली नव्हती. व्हीलचेअरवर त्याचा बाप घेऊन आला होता. पाच लाख लिहिले आणि धनादेश दिला. असे काही प्रसंग एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.