मुंबई : मुलं पळविणारी टोळी ऐकली आहे. पण, बाप पळविणारी औलाद सध्या महाराष्ट्रात फिरते, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे मेळाव्यात केली. ठाकरे म्हणाले, मला आश्चर्य वाटतं. तुम्ही आम्ही सर्वांनी यांना सत्तेचं दूध पाजलं. मानसन्मान दिला. आता तोंडाची गटारं उघडलीत यांची. या सर्वांना तुम्ही उत्तर देतच आहात. पण, विशेष म्हणजे मुंबईवरती आता गिधाड फिरायला लागली आहेत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
शेतकरी बैलाला आपल्या कुटुंबातील सदस्य मानतात. पण, काही लोकं शिवसेनेला बदनाम करण्याचं काम करताहेत. सर्व मिळून अंगावर या. अस्मान काय असतं ते दाखवितो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना दिला.
भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, तुमची ताकद किती ही विरोधकांना कळली आहे. आपल्यातले काही मुन्नाभाई, गद्दार त्यांनी सोबत घेतले आहेत. उद्धव ठाकरेंना संपवा, असं सर्व ठरलंय. पण, हे सर्व माझं ठाकरे कुटुंब आहे. या सर्वांना संपवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.
शिवसेना हा काही ठेकूळ नाही की, कुणीही आला नि चिरडून गेला.संघर्ष झालाच तर गद्दारांमध्ये आणि आपल्यामध्ये होईल. रक्तपात हा शिवसैनिकांमध्ये होईल. कमळाबाईची तब्यत साफ राहील. मला तो डाव साधायचा नाही, असंही ते म्हणाले.
आपल्यासोबत गोचीड होते. ते रक्त पिऊन फुगले असते. फुटले असते. तरी त्यांची हाव सुटली नसती. ते गेलेत ते बरे झाले. ढिगभर गद्दार असण्यापेक्षा मुठभर निष्ठावंत असणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत.
भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी तुम्ही पक्षात घेतलं. त्यांना आता क्लीनचीट देत आहात.भ्रष्टाचारानं बरबटलेली माणसं घेऊन तुम्ही भ्रष्टाचाराची लढाई कशी करणार, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला.
भाजपनं माणसं धुवायची लाँड्री काढली आहे काय? मनी लाँड्रींग असतं. ही काय ह्युमन लाँड्रींग आहे काय. आरोप करायचे, पक्षात आला की, धुऊन स्वच्छ. गोरा पान झाला एकदम, असं काही क्रिम वैगेरे आहे काय तुमच्याकडं. ब्युटी क्रीम. पण, तुमचे हे चाळे आता लोकांसमोर दिसताहेत, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.