मुंबई : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झालाय. असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. तर, बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातल्या महू या गावात झाला. असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. मीडियासोबत बोलताना संजय राऊत म्हणाले, विरोधी पक्षाचा आणि जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. असं घडू नये. पण, महाराष्ट्रामध्ये हे घडतंय. या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. बाबासाहेबांनी लोकशाही जन्माला घातली. त्या महाराष्ट्रात हे घडतंय, हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
ही चूक लक्षात येताच भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. चित्रा वाघ म्हणाल्या, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही. मध्य प्रदेशातील महू येथे झाला. इतक सामान्य ज्ञान असू नये. आमचे आदर्श असणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवताय, असा सवालही चित्रा वाघ यांनी विचारला. रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
अशा पद्धतीनं राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा. मोर्चेसुद्धा तुम्ही स्वतःच काढायचे. मूर्ख समजू नका. महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे. तुमचा जाहीर निषेध, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना सुनावलं.
महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली. पण, अटी, शर्ती लावण्यात येत आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे मुद्दाम चाललेलं आहे. विरोधी पक्षाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी जाण्यापूर्वी हे विधान संजय राऊत यांनी केलं. कोर्टातून निघण्यासाठी उशीर झाला, असं म्हणून संजय राऊत बैठकीसाठी निघून गेले.