मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत सुन्न करणारी घटना घडली. खरंतर या मुंबईची महती मोठी आहे. या मुंबईला मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या 106 हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली. मुंबईचा इतिहास फार मोठा आहे. या मुंबईला स्वप्न पूर्ण करणारी मायानगरी म्हटलं जातं. पण याच मायानगरीत सरकारी वसतिगृहात जी घटना घडलीय त्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. मुंबई मुली आणि महिलांसाठी सुरक्षित शहर मानलं जातं. पण मुंबईच्या अतिशय हायप्रोफाईल आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात एका सरकारी वसतिगृहात 19 वर्षाच्या मुलीवर अत्याचार आणि तिच्या हत्येची घटना घडली. पीडितेच्या आई-वडिलांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना आक्रोश केला.
“साहेब, माझ्या मुलीची मुंबईतील पंजाबराव देशमुख हॉस्टेलमध्ये नंबरला लागला होता. पण तिथे मुलं-मुली असल्याने मी तिथे ठेवलं नाही. कारण तिथे मुलं असल्याने तिच्या सुरक्षेबाबत मला भीती होती. त्यामुळे मी सरकारी मुलींच्या वसतिगृहात तिचा प्रवेश घेतला. तिच्या सुरक्षेसाठी मी तो निर्णय घेतला होता. पण सरकारी हॉस्टेलही तिच्यासाठी घातक ठरेल, असं मला माहिती नव्हतं”, असं म्हणत पीडितेचा पिता रडू लागला.
“लाखभर पगार घेणारे हे अधिकारी काय करतात? ते मुलींची काय देखभाल करत आहेत? आज माझ्या मुलासोबत असं काही झालं, उद्या आणखी कुणाच्या मुलीसोबत होईल. आज तर त्यांनी हात वर केले. माझ्या मुलीचा मृतदेह बाहेर पाठवून दिला, आरोपी मरुन गेला, हॉस्टेलचे हात वर झाले. पोलिसांनी पोलिसांचं काम करुन घेतलं. आम्हाला कुठे न्याय मिळाला?”, असा सवाल पीडितेच्या वडिलांनी केला.
“माझं एवढंच म्हणणं आहे की, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणातील आरोपी मरण पावला असला तरी वसतिगृह प्रशासन या प्रकरणाला सर्वस्वी जबाबदार आहे. चौथ्या मजल्यावर एकटीला ठेवलं. तिच्यासोबत दुसऱ्या मुलीला ठेवलं नाही. या प्रकरणात वसतिगृह प्रशासन जबाबदार आहे, अशी आमची ठाम भूमिका आहे. यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांना सहआरोपी तरी केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे”, असं पीडितेचे पिता म्हणाले.
“मुलीला गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरक्षा रक्षकाडून त्रास होता. त्याआधीही तिला अधुनमधून त्रास झाला. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्रास जास्त झाला तेव्हा तिने वसतिगृहाच्या प्रमुख असलेल्या मॅडमना सांगितलं होतं. तसेच आम्हालाही सांगितलं होतं. आम्ही म्हटलं की, जाऊदे आता तुझी सुट्टीच होतेय”, असं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं.
“तिचा 5 तारखेला शेवटचा पेपर होता. त्यामुळे मी तिचं 8 तारखेचं ट्रेनच्या तिकीटाचं रिझर्व्हेशन केलं. ती 5 तारखेला आमच्यासोबत बोलली. पण 6 तारखेला तिने फोन उचललाच नाही. आम्ही दिवसभर परेशान झालो. शेवटी आम्ही दुपारी तीन-चार वाजता तिच्या हॉस्टेलमधील एका मैत्रिणीला फोन केला. तेव्हा तिने सांगितलं की, तिच्या रुमला बाहेरुन टाळा आहे. पण ती हॉस्टेलच्या बाहेर गेली नाही. मी हॉस्टेलच्या प्रमुख अंधारे मॅडम यांना फोन केला. त्यांनी मला सांगितलं की, पोलिसांना बोलवावं लागेल, तुम्ही ताबडतोब या. नंतर आम्ही इथे निघून आलो”, असा घटनाक्रम पीडितेच्या पित्याने सांगितला.
“हॉस्टेल प्रशासनाशी मुलीला होत असलेल्या त्रासाबद्दल काही बोलणं झालं नव्हतं. पण माझ्या मुलीने अंधारे मॅडमला सांगितलं होतं. तेव्ही त्या मॅडम म्हणाल्या की, आता हॉस्टेल खालीच करणार आहोत. तुम्ही आता तीन-चार दिवस राहिली. त्यामुळे ती 5 तारखेपर्यंत ती तिथे राहिली”, असं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं.
“ती 6 तारखेला तिचं सामान तिसऱ्या मजल्यावर आणणार होती. कारण तिला सुट्ट्या लागल्या होत्या. पण तिच्यासोबत 6 तारखेला सकाळी घातपात झाला. याला हॉस्टेल प्रशासन जबाबदार आहेत. तिथे असणाऱ्या कडू आणि अंधारे मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा आम्ही आमच्या मुलीचा मृतदेह नेणार नाहीत”, अशी भूमिका पीडितेच्या आई-वडिलांनी घेतली.