नवी मुंबई: पनवेल तालुक्यात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी घेऊन झाल्यानंतर सिडकोने आम्हाला वाऱ्यावर सोडले, असा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात आला आहे. सिडकोच्या या कारभाराविरोधात मंगळवारी 10 गावांतील ग्रामस्थांनी सिडकोच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गावकऱ्यांचा सिडकोविरोधातील रोष दिसून आला. या गावकऱ्यांनी सिडको भवनला घेराव घालत आक्रमक निदर्शने केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत या आंदोलकांना ताब्यात घेतले. (Navi Mumbai people protest against CIDCO)
आम्ही विमानतळासाठी जमिनी दिल्या. त्यामुळे आमचे पारंपरिक व्यवसाय बंद झाले. या मोबदल्यात आमच्या मुलांना नोकऱ्या आणि पुनर्वसनासाठी भाडे देण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. परंतु सिडकोने जमिनी घेऊन झाल्यानंतर या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. सिडकोने आमच्यावर अन्याय केला असून आमचे प्रश्न सोडवत नसल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
विमानतळासाठी सिडकोकडून 1360 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण
11 गावे, 8 वाड्या आणि 1360 हेक्टर जमीन संपादित करून सिडको नवी मुंबई विमानतळाची उभारणी करीत आहे. दोन वर्षांपासून सिडकोकडून सुरू असलेले विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. उलवे टेकडी जमीनदोस्त करून नदीचा प्रवाह बदलण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले. नदीचा प्रवाह बदलण्याचे काम म्हणजे सिडकोसाठी सर्वात मोठा टप्पा होता. या टप्प्याचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, 1360 हेक्टर जमीन संपादित करूनही सिडकोला आणखी जमिनीची आवश्यकता आहे.
नवी मुंबईच्या बाजूला सिडको वसवणार नवं शहर
गेल्यावर्षी सिडकोने नवी मुंबईच्या बाजूला नवं शहर बनवण्याची योजना जाहीर केली होती. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन या चार तालुक्यातील 40 गावातील जवळ जवळ 19 हजार हेक्टर जमीन अधिग्रहीत केली जाणार होती.
चणेरा, कोकबन, दिव, खैराळे, गोफण आदी भागात काही वर्षांपूर्वी भूमापन झाले होते. परंतु ते कशासाठी झाले याबद्दल परिसरातील नागरिकांना कल्पना नव्हती. आता वृत्तपत्रातल्या बातम्यांमुळे या भागात सिडकोमार्फत विकास होणार असल्याचं समोर आले आहे.
या भागातील शेतकऱ्यांना नवी मुंबई विमानतळाप्रमाणे मोबदला, विकसित जमीन आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगार भेटणार असेल तर या प्रकल्पासाठी जमिनी देण्याची तयारी स्थानिकांनी दाखवली होती.
संबंधित बातम्या:
नवी मुंबईच्या बाजूला आणखी एक नवं शहर वसणार, सिडकोची अधीसूचना जारी
(Navi Mumbai people protest against CIDCO)