रायगड : नवी मुंबईच्या बाजूला नवी मुंबईपेक्षा मोठं शहर वसणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन या चार तालुक्यातील 40 गावातील जवळ जवळ 19 हजार हेक्टर जमीन तिसऱ्या सिडको शहरासाठी घेतली जाणार आहे. तशी अधीसूचना नुकतीच सिडकोने काढली असून नवी मुबंईपेक्षा जास्त जमीन संपादन होणार आहे. नवी मुबंई करीता 18 हजार 842 हेक्टर जमीन सपांदीत झाली होती. त्यापेक्षा जास्त आता रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या सिडको विकासासाठी जमीन घेतली जाणार आहे.
चार तालुक्यातील 40 गावांपैकी 27 गावे ही रोहा तालुक्यातून सपांदीत होणार आहेत. चणेरा, कोकबन, दिव, खैराळे, गोफण आदी भागात काही वर्षांपूर्वी भूमापन झाले होते. परंतु ते कशासाठी झाले याबद्दल परिसरातील नागरिकांना कल्पना नव्हती. आता वृत्तपत्रातल्या बातम्यांमुळे या भागात सिडकोमार्फत विकास होणार असल्याचं समोर आले आहे.
या भागात या अगोदर रिलायन्स सेज, MIDC साठी जमिनी घेण्यात आल्या होत्या. परंतु त्यावर कोणाताही विकास झाला नाही आणि शेतीही झाली नाही. यावेळीही असे होणार असेल तर या भागातील शेतकरी विरोध करणार अशी शेतकऱ्यांची भूमिका दिसून येते.
या भागातील शेतकऱ्यांना नवी मुबंई विमानतळाप्रमाणे मोबदला, विकसित जमीन आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगार भेटणार असेल तर या प्रकल्पाचे मात्र शेतकऱ्यांकडून स्वागत होणार एवढे मात्र नक्की.
महानगरी मुंबईला लागून सिडकोमार्फत नवी मुंबई हे सुंदर शहर वसवण्यात आलं. आता नवी मुंबईतली लोकसंख्याही आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे नवी मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या चार तालुक्यांचाही आता सिडकोमार्फत विकास होतोय. रायगड जिल्हा हा मुंबईच्या आणखी जवळ येणार आहे.