मोठी बातमी! धारावीत काँग्रेस-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, अनेक जण जखमी झाल्याची माहिती

| Updated on: Nov 10, 2024 | 8:48 PM

मुंबईतील धारावीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. धारावीत प्रचारादरम्यान काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. कार्यकर्त्यांचा हा आक्रमकपणा धक्काबुक्कीपर्यंत गेला. या घटनेत काही कार्यकर्ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

मोठी बातमी! धारावीत काँग्रेस-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, अनेक जण जखमी झाल्याची माहिती
धारावीत काँग्रेस-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
Follow us on

राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. प्रत्येक पक्षाकडून आपला उमेदवार निवडून यावा यासाठी जोरदार प्रचार केला जातोय. मोठमोठे नेते महाराष्ट्रात येऊन आपापल्या पक्षाचा प्रचार करत आहेत. निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. निवडणुकीत मतदारांना पैशांचं आमिष दाखवून मतदान होऊ नये याची संपूर्ण काळजी सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांकडून घेतली जात आहेत. यातूनच राज्यभरातील विविध भागांतून कोट्यवधी रुपये आतापर्यंत जप्त करण्यात आले आहेत. असं असताना राज्यात निवडणुकीच्या वातावरणात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. पण तरीही काही ठिकाणी प्रचारादरम्यान वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होत असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबईच्या धारावीतून अशाच प्रकारची एक मोठी बातमी समोर येत आहे.

धारावीत काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले आहेत. प्रचार सुरू असताना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. ही धक्काबुक्की इतकी वाढली की दोन्ही गटाचे कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. संबंधित मतदारसंघात काँग्रेसकडून ज्योती गायकवाड या उमेदवार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून राजेश खंदारे हे उमेदवार आहेत.

खासदार वर्षा गायकवाड यांच्या पतीला धक्काबुक्कीचा आरोप

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जयश्री रामच्या घोषणा देत खासदार वर्षा गायकवाड यांचे पती राजू गोडसे यांना देखील धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे धारावीत तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. घटनेनंतर संबंधित परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. दरम्यान, घटनेनंतर आता काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते धारावी पोलीस ठाण्याबाहेर जमायला सुरुवात झाल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

संबंधित घटनेनंतर पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे 9 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत अशाप्रकारची घटना घडणे अनपेक्षित आहे. आता या घटनेनंतर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात? की यातून राजकीय वाद जास्त चिघळतो? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.