मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : प्रदूषणाच्या वाढत्या समस्येने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईतही कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे. प्रदूषणामुळे देशाची राजधानी दिल्लीनंतर मुंबईलाही घेरले आहे. एकदा कृत्रिम पाऊस पाडल्यानंतर पंधरा दिवस प्रदुषणापासून सुटका मिळणार आहे. परंतू प्रदूषणासाठी पाऊस पाडण्याचा एका वेळचा खर्च 40 ते 50 लाख येणार आहे. या प्रक्रियेत पाऊस पडण्याची शक्यता 50-50 टक्के असते. तसेच वातावरण, वेळ, प्रयोगाच्या ठिकाणाचे वातावरण आणि ढगांची उपस्थिती यावरच कृत्रिम पावसाचा प्रयोग अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
जगातील सर्वात प्रदूषित शहरात राजधानी दिल्ली तसेच आर्थिक राजधानी मुंबईचाही अंतर्भाव होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईची हवा दिवाळीनंतर अधिकच प्रदूषित झाली आहे. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मुंबईतही कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार असून यासाठी पुढील आठवड्यात टेंडर काढण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी म्हटले आहे. येत्या 15 ते 20 दिवसात प्रक्रिया पूर्ण होऊन 15 डिसेंबरनंतर मुंबई कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याचे म्हटले जात आहे. दुबईत वारंवार कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातो. तेथील तज्ज्ञांच्या आमचे तंत्रज्ञ संपर्कात असल्याचे सुधाकर शिंदे यांनी सांगितले. तेथील प्रयोगाचा अभ्यास येथील प्रयोगासाठी खूपच महत्वाचा ठरणार आहे, कारण दोन्ही ठिकाणाचे हवामान सामान्य आहे. परंतू हा प्रयोग यशस्वी होण्याची शक्यता 50-50 टक्के इतकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी देखील मुंबई महानगर पालिकेने साल 2009 मध्ये क्लाऊड सीडींग म्हणजेच कृत्रिम पाऊसाचा प्रयोग झाला होता. मात्र त्यावेळी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी हा प्रयोग झाला आहे. त्यावेळी 8 कोटी रुपये खर्च करूनही पालिकेला पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी काहीही फायदा झाला नव्हता. साल 2012 मध्येही मुंबईत पाण्याची टंचाईमुळे कृत्रिम पावसाची योजना आखली होती.
कृत्रिम पाऊसासाठी त्या क्षेत्रात आद्रता 70 टक्के पाहीजे. यासाठी योग्य ढगांची निवड करून त्यात विशेष प्रकारचे कणांचा शिडकाव केला जातो. हे कण पावसाच्या थेंबाच्या केंद्राच्या रुपाने कार्य करतात. या केंद्रात बाष्फ एकत्रित होते. ज्यामुळे त्यांचा आकार वाढत जातो. पावसाच्या थेंबाच्या रुपात ते खाली कोसळतात. गरम आणि थंड ढंगासाछी कृत्रिम पाऊसाची वेगवेगळी पद्धत आहे. कृत्रिम पाऊस तीन प्रकारे केला जातो. विमानाने शिडकावा, ढगात रॉकेटद्वारा रसायने सोडणे आणि जमीनीवर रसायने जाळणे यांचा समावेश आहे. परंतू हे सर्व केल्यानंतर पाऊस शंभर टक्के पडेलच याची गॅरंटी काही नसते असे म्हटले जाते.