विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी विधानसभेसाठी रणनिती आखायला सुरुवात केलीय. अशातच शिवसेना शिंदे गटाचंही प्लॅनिंग झालंय. विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सेंच्युरी प्लॅन’ केला आहे. शिवसेनेने महायुतीत 100 जागांवर दावा केला आहे. या 100 जागा लढवण्यावर शिवसेना ठाम आहे. त्यासाठी राज्यभरात शिवसेनेकडून 100 विधानसभा निरीक्षक नेमले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’निवासस्थानी शिवसेनेची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‘वर्षा’निवासस्थानी झालेल्या शिवसेनेची महत्वाची बैठक झाली. यात आगामी निवडणूक आणि पक्ष बांधणीवर जवळपार चार तास चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा. पक्षात नवे सदस्य येतील यावर भर द्या. सदस्य नोंदणीवर भर द्या, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करावी. प्रत्येकाने आपल्या मतदार संघावर लक्ष द्यावं. आपल्याला आगामी निवडणुकीत चांगलं मताधिक्य मिळवायचं आहे. त्यासाठी सरकारची कामं, योजना लोकांपर्यंत पोहोचवा, असं एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
शिवसेनेच्या या बैठकीत महायुतीबाबतही चर्चा झाली. महायुतीत बेबनाव होणार नाही याची काळजी सर्व आमदारांनी घ्यावी. युती असल्यामुळे एखाद्यावेळेला जागांची अदलाबदल करावी लागेल. पण जागेची अदलाबदल झाल्यास मनाची तयारी ठेवावी लागेल. आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवारांनाही चांगलं सहकार्य करा, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शिवाय आगामी निवडणुकीत कोणता- पक्ष किती जागा लढणार आणि किती जागा जिंकणार, हे देखील येत्या काळात स्पष्ट होईल.