नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवडी-न्हावाशेवा सागरी प्रकल्पाची पाहणी केली आहे. या प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या सी-लिंकमुळे प्रवाशांच्या वेळेची चांगलीच बचत होणार आहे. एमएमआरडीएकडून 21.81 किमी लांबीच्या सागरी सेतूचे बांधकाम पूर्ण झालं आहे. या सागरी सेतूची युद्ध पातळीवर तयारी सुरू होती. या सेतूवरून वाहने, मालवाहू वाहने, बांधकाम साहित्य नेणे शक्य होणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएकडून आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. तसेच त्यांनी सागरी सेतूवरून वाहनाने प्रवासही केला.
एमएमआरडीएने 9 मे या तारखेला पारबंदर प्रकल्पातील शेवटच्या 70 वा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचे (पोलादी कमान) काम पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता संपूर्ण सी-लिंकच काम पूर्ण झालंय. काम पूर्ण झाल्याने आता मुंबई आणि मुख्यभूमी अर्थात शिवडी –चिर्ले भाग एकमेकांशी जोडला गेलाय. त्यामुळे प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
भारतातील सर्वात लांब सी-लिंक म्हणून शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प ओळखला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“ट्रान्स हार्बर लिंक रोडमध्ये एक महत्वाचा टप्पा आज आपण गाठलं आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण होऊन याचा लोकार्पण होईल, अशी अशा बाळगतो. पुढील 20 वर्षात आर्थिक चालना देण्याचे काम हा ब्रिज करतोय. जमिनीच्या कमतरतेमुळे ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्या आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मी खरंतर जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून याची चर्चा आहे. पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात अस्तित्वात आले. ट्रिलियन डॉलरकडे आपला प्रवास सुरु झालाय”, असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकमुळे वाहतूक कोंडीची समस्या सूटणार आहे. विशेष म्हणजे शिवडी ते नवी मुंबईतील तिर्ले हा प्रवास 15 ते 20 मिनिटात पूर्ण होणार आहे. या पुलाची एकूण लांबी 22 किमी आहे. हा देशातील सर्वात जास्त लांबीचा पूल आहे. या पुलाचं लोकर्पण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे या पुलामुळे आता मुंबई-पुणे प्रवासही अवघ्या तीन तासांचा होणार आहे.