मुंबई : दसरा मेळाव्यामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेत्यांनी भाषणांमधून एकमेकांवर जोरदार टीकेचे ताशेरे ओढले. उद्धव ठाकरेंनी तासभर भाषण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकेचे बाण सोडत सभा गाजवली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंवर निशाणा साधत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी कशी फिल्डिंग लावली ते जाहीरपणे सांगितलं सांगत त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी सावध राहावं, असा सल्ला शिंदेंनी दिला आहे.
बाळासाहेबांना मी शब्द दिला आहे शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, आम्ही विचारात पडलो कुठल्या शिवसैनिकाला बसवणार? मात्र हे महाशय टुनकन उडाले आणि खुर्चीत जाऊन बसले. मागचं पुढचं सगळं सोडलं आणि म्हणाले मला कुठे व्हायचंय, पवार साहेबांनी सांगितलं. यांनी पवारांकडे दोन माणसे पाठवली होतीत आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा अशी विनंती केली. हे काही लपत नाही.
तुमचं 2004 पासून बसायचं ठरलं होतं मात्र जुगाड काही होत नव्हता. जसे विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले की आले रे आले, लगेच यांनी सांगितलं आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. अरे तुम्ही युतीत निवडणूका लढले दुसरे दरवाजे कसेकाय शोधायला लागले.
मुख्यमंत्री व्हायचंच होतं मात्र दाखवायचं नव्हतं, एक चेहरा आहे पण त्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे दडले आहेत. भोळेपणाने तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावं, चेहऱ्यावर जावू नका, पोटातील पाणीही हालून दिलं नाही. पोटात एक ओठात एक असं आमचं काम नाही पण मी त्याचा साक्षीदार आहे. शेवटपर्यंत कळून दिलं नाही ना चेहऱ्यावर दाखवून दिलं नाही. हीच खरी कमाल आहे आपल्याला दाखवून दिलं नाही. मुख्यमंत्री बनण्यासाठी संधी साधू बनल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.