कसब्यातील पराभवानंतर सत्ताधारी अलर्ट, मुख्यमंत्र्यांनी खासदारांची तातडीची बैठक बोलावली; मोठी रणनीती ठरण्याची शक्यता

| Updated on: Mar 12, 2023 | 10:04 AM

कसब्यात भाजपचा पराभव झाला. तब्बल 30 वर्ष वर्चस्व असलेला मतदारसंघ भाजपच्या हातून गेला. शिंदे गट आणि विशेष म्हणजे मनसेसोबत असूनही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे.

कसब्यातील पराभवानंतर सत्ताधारी अलर्ट, मुख्यमंत्र्यांनी खासदारांची तातडीची बैठक बोलावली; मोठी रणनीती ठरण्याची शक्यता
cm eknath shinde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी अलर्ट झाले आहेत. भविष्यात अशा पराभवाचा सामना करावा लागू नये म्हणून सत्ताधाऱ्यांकडून रणनीती ठरवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व खासदारांना तातडीने बैठकीला बोलावलं आहे. शिंदे यांनी फक्त खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे. त्यामुळे बैठकीत काय मोठी रणनीती ठरवली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त शिवसेना खासदारांची तातडीची बैठक बोलावल्याचं सूत्रांनी सांगितलं. आज सकाळी 10 वाजता वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीतील विषय मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकित पक्षाची संघटनात्मक बांधणी, 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना आखली जाणार असल्याचे कळते. तसेच मतदार संघातील प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्याच बरोबर सुप्रीम कोर्टातील निकाल आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधत आणलेला हक्कभंग राज्यसभेत त्यावरील हरकतीबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा

कसब्यामुळे अलर्ट

कसब्यात भाजपचा पराभव झाला. तब्बल 30 वर्ष वर्चस्व असलेला मतदारसंघ भाजपच्या हातून गेला. शिंदे गट आणि विशेष म्हणजे मनसेसोबत असूनही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भाजपपेक्षाही शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं सांगितलं जातं. कसब्याचा पॅटर्न जर कायम राहिल्यास निवडून येणंही मुश्किल होईल, असं शिंदे गटातील नेत्यांना वाटत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून शिंदे गटाकडून आतापासून खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज खासदारांची तातडीची बैठक बोलावली गेली असल्याचं सांगितलं जातं.

खासदारांवर जबाबदाऱ्या देणार?

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून खासदारांना जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या खासदारांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या सभा घेण्यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, बैठकीचा तपशील कुणालाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे बैठकीत नेमकी कशावर चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.