मुंबई : मराठी भाषकांचं अखंड महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याचं स्वप्न 1 मे 1960 रोजी पूर्ण झालंय. पण हे स्वप्न सत्यात उतरलं असलं तरी महाराष्ट्र हा अखंड स्वरुपात अद्याप एकरुप झालेला नाही. कारण बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, आणि बिदर हे भाग महाराष्ट्रापासून वंचित राहिले आहेत. सीमा भागातील हे भाग शेजारील राज्यांत गेले आणि मराठी साहित्यिक, क्रांतीकारक, नेतेमंडळींची ही लढाई काही प्रमाणात अपुरीच राहिली. बेळगावला महाराष्ट्रात सहभागी करुन घेण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पण सर्व प्रयत्न आतापर्यंत निष्फळ ठरले आहेत. पण तरीही राज्य सरकार त्याच जोमाने बेळगाव महाराष्ट्रात सामील करुन घेण्यासाठी लढणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्शन मोडवर आले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने समिती गठीत केलीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ही सर्वपक्षीय समिती गठीत केलीय.
मुख्यमंत्र्यांनी गठीत केलेल्या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचा समावेश आहे. या समितीत काही मंत्र्यांचा देखील समावेश करण्यात आलाय.
या समितीची पहिली बैठक उद्या मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीमा प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यास मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यांची समिती तयार होणार आहे. या समितीसाठी आणि या संबंधित चर्चेसाठी उद्या सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आलीय.