आज महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत निर्णयांचा धडाका पाहायला मिळाला. धारावी पुनर्विकासाबाबत अत्यंत मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मुंबईतील आणखी 125 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. देवनार डंपिंग ग्राऊंडची 125 एकर जागा धारावी प्रकल्पाला दिली जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिंदे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईत प्रवेश करतान लागणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी दिली जाणार आहे. वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी दिली जाणार आहे. नुकत्याच बांधण्यात आलेल्या अटल सेतूसाठी हा नियम लागू असणार नाही. राज्याच्या विधानसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळाकडून मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी कामांना मंजुरी मिळवून घेण्यासाठी नागरिकांनी मंत्रालयाबाहेर गर्दी केली आहे. शेवटच्या कॅबीनेटमध्ये सरकार कामांना मंजुरी देईल, असा आशावाद नागरीकांना आहे. आचारसंहिता लागण्याअगोदर मंत्रालयीन काम व्हावीत यासाठी सकाळपासून मंत्रालयाच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. सकाळी 6 पासून सामान्य नागरिक पासच्या रांगेत उभे आहेत.
गेले अनेक दिवस आम्ही मंत्रालयात काम व्हावी यासाठी येतोय, पण कामं होत नाहीत. आचारसंहिता लागण्याची लक्षणं आहेत. ही शेवटची कॅबिनेट असेल अशी शक्यता आहे. म्हणून आमची काम व्हावीत म्हणून आम्ही सकाळपासून आलो आहोत. किमान आज तरी काम व्हावं, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली आहे.