Rahul Gandhi : जोपर्यंत सच्चा शिवसैनिक आहे, तोपर्यंत आरक्षणाला… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर डागली तोफ

| Updated on: Sep 11, 2024 | 2:57 PM

CM Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी अमेरिकन दौऱ्यात देशातील आरक्षणाविषयी मोठं वक्तव्य केले होते. त्यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकारणात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे.

Rahul Gandhi : जोपर्यंत सच्चा शिवसैनिक आहे, तोपर्यंत आरक्षणाला... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर डागली तोफ
एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल
Follow us on

राहुल गांधी अमेरिकन दौऱ्यावर असताना देशातील आरक्षणाविषयी मोठे भाष्य केले. त्यांनी अनेक मुद्यांवर तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी देशातील आरक्षण किती संपणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ज्यावेळी योग्य वेळ येईल. त्यावेळी आरक्षण संपेल. पण सध्या ती योग्य वेळ नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. या विधानाचे पडसाद भारतात लागलीच उमटले. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. राहुल गांधी हे आरक्षणाचे मारेकरी असल्याचा प्रहार सुरू केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा तापणार हे वेगळं सांगायला नको.

राहुल गांधी यांचे वक्तव्य काय?

हे सुद्धा वाचा

देशात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित जाती, आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी संघर्ष करत आहेत. आंदोलने सुरु आहेत. याविषयी विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न केला. त्यावेळी आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केले. ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. सध्या योग्य वेळ नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचा जोरदार हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमावर राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरुन जोरदार हल्लाबोल केला. “विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला.” असे मुख्यमंत्री म्हणाले.

आरक्षण संपू देणार नाही

आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपला भारत देश ही ‘फेअर प्लेस’ नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणं हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते. अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.