मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता शिंदे-भाजपने त्यांना पूर्णपणे घेरलंय. एक तर संपूर्ण काँग्रेसविरोधी भूमिका स्पष्ट करा, अन्यथा हे नाटक असल्याचं मान्य करा, अशा आशयाची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोहोंनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून मांडलेली भूमिका अर्धवट आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत दिली होती, ही हिंमत तुम्ही दाखवणार का? असा थेट सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केलाय.
राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले, मात्र सहन करणार नाही, म्हणजे नेमकं काय करणार, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. ते म्हणाले, ‘ कालच्या जाहीर सभेत सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं ते म्हणाले.. म्हणजे काय करणार नाही, हे विचारलं पाहिजे. बाळासाहेबांनी तेव्हा मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत लगावली होती. ही हिंमत तुम्ही दाखवणार का, असा सवाल शिंदे यांनी केला.
शिवसेनेने सावरकरांवरून काँग्रेसला सुनावलेले बोल म्हणजे केवळ नाटक असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ते म्हणाले, ‘ फक्त सगळ्या बाजूंनी भडीमार झाला, तेव्हा हे उशीराचं शहाणपण होतं. बोलून काय होणार, हे कृतीतून दिसलं पाहिजे. हे ठरवून सुरु आहे. तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, असं सुरु आहे.
सावरकरांचा अपमान झाल्याने संपूर्ण राज्यात सावरकर प्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. सावरकर हे देशभक्त होते. त्यांचा त्याग, देशभक्ती आहे. यामुळे विधानसभेच्या प्रांगणात शिवसेना-भाजप युतीच्या आमदारांनी त्यासाठीच आंदोलन केलं. संतापातून हे आंदोलन सुरु आहे. सावरकरांविरोधात जे जे बोलतील, त्यांच्याविरुद्ध लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिलाय.
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांनी एक दिवस अंदमानच्या जेलमध्ये राहुन यावं असं आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिलं. ते म्हणाले, ‘ ज्या सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. देशासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. स्वातंत्र्याचा उपभोग सगळे घेतोय. त्यामुळेच या देशात लोकशाही आहे. मात्र त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचा निषेध राज्यच नव्हे तर देशभरात केला जातोय. एक दिवस सावरकर जिथे अंदमानाच्या जेलमध्ये राहत होते, तिथे राहुल गांधींनी राहून यावं. ज्यांनी त्यांचा अवमान केला, ते वारंवार सांगतायत, मी सावरकर नाही, गांधी आहे. सावरकरांचा त्याग तुमच्यात नाही. सावरकर व्हायला देशाबद्दल प्रेम पाहिजे. तुम्ही तर परदेशात जाऊन देशाची निंदा करता. यापेक्षा देशाचं दुर्दैवं काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय.