मुंबई: आजारातून बरे झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आता महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना (shivsena) इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. आता मीही महाराष्ट्रभर (maharashtra) फिरणार आहे. तुमच्यासोबत फिरण्यासाठी धोके पत्करून मी शस्त्रक्रिया केली आहे. आता दौरे करणार दुसरा टप्पा आता सुरु होईल. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान टप्पा 2 च्या निमित्ताने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हासंपर्कप्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी राज्यात शिवसेना मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या. तसेच तुम्ही संघटनेवर जोर द्या. बाकीचं मी बघून घेतो. बाहेरच्या राजकीय हल्ल्यांना मी बघून घेईल, असंही मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
गट प्रमुख, शाखाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांच्या याद्या मला हव्या आहेत. जन्मापासून शिवसेनेकडे नवीन तरुण रक्त आहे. गावागावातून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या मग बदल करा. पूर्वी शाखेचे बोर्ड होते, शाखा कार्यालय होते ते बघा, असं करत शिवसेना वाढवायची आहे. शिवसैनिक अंगार आहेत. त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही. फक्त त्यांना भेटून धीर द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे त्याला समजू द्या. गावाची जनतेची कामे सुध्दा त्या गावाची जरुर घेवून घ्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.
काल प्रवक्त्यांची बैठक झाली आहे. मी अगदी थोडक्यात बोलणार आहे. अनेक दिवसांनी शिवसंपर्क मोहीम सुरू होत आहे. इतर पक्ष मुहूर्ताची वाट न बघता संपर्क करताहेत. येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आपण कोल्हापूरच्या निवडणुकीत हिररीने पुढाकार घेतला. या पुढेही असंच एक दिलाने आपल्याला काम करायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
पश्चिम बंगाल केरळ सारखे आपल्याला हिंदू द्रोही ठरवायचा प्रयत्न सुरू आहे. ही त्यांची पद्धत आहे. बंगालच मोठ कर्तृत्व आहे. यावेळी ममता दिदींनी गेल्या वेळपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची वेळ आली आहे. हिंदूंमध्ये फोडाफोड करणं, महाराष्ट्रात मराठी अमराठी वाद निर्माण करणं ही भाजपची चाल आहे, असंही ते म्हणाले.