मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी दिलेल्या सशक्त, महान अशा राज्यघटनेच्या पाठबळावरच आपल्या राज्याची विकासाची वाटचाल सुरु आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 13 व्या जयंती दिनाच्या पुर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, डॅा. आंबेडकर यांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम अशी राज्यघटना (Indian Constitution) दिली आहे. या सशक्त राज्यघटनेच्या माध्यमातूनच आपण प्रजासत्ताक आणि बलशाली राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहोत. तसेच विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेच्या एका सुत्रात गुंफून एकसंघ ठेवण्याची किमया डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपल्याला कृतज्ञच राहावे लागेल. डॉ. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आपल्याला राज्य आणि देशाबद्दलची बांधिलकी जाणीवपूर्वक जपावी लागेल. डॉ. आंबेडकर यांच्या समता-बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता या सुत्रांविषयी जागरूक राहावे लागेल, हेच त्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन आणि या जयंती दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क आणि स्वाभिमानासाठी लढण्याचे बळ दिले. ‘शिका आणि संघटीत व्हा’ या त्यांच्या संदेशाने बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचे कल्याण केले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारत देशाला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचे, देशाची सार्वभौमता अखंडित ठेवण्याचे काम बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झाले. असे म्हणत अजित पवारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.
नागरिकांना एका मताचा समान अधिकार, सर्वांना स्वाभिमानाने जगण्याची, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार हे कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, तर अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे. डॉ. बाबासाहेबांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणे, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा विकास करणे, हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे, स्मृतींचे स्मरण करुन त्यांना वंदन केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांसारखे महामानव आपल्या देशात जन्मले आणि त्यांनी देशाला जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली हे आपले भाग्य आहे. डॉ. बाबासाहेब हे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ होते. घटनातज्ज्ञ होते. अर्थतज्ज्ञ होते. लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार सुद्धा होते. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचे काम त्यांनी केले. डॉ. बाबासाहेबांनी केलेला, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचे आंदोलन, शेतकरी हक्कांच्या चळवळीसारखे दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका, हे लढे देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. बाबासाहेब कृतीशील विचारवंत होते. ध्येयासाठी, विचारांसाठी लढण्याची ताकद त्यांनी समाजाला दिली, असे म्हटले आहेत.
बाबासाहेबांच्या विचारातच देशाचे, अखिल मानवजातीचे कल्याण आहे. डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचतील, त्यातून देशाची राज्यघटना, एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना जयंतीनिमित्त वंदन केले असून सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.