मुंबई : ‘महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. त्यावर विविध क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून आपल्या मुलांनी शिक्कामोर्तब केले आहे, अशा शब्दांत मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे,’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी या विजेत्यांना शाबासकी दिली. (CM Uddhav Thackeray Congratulate PM National Children’s Award winners)
भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले जातात. नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार दिले जातात. यंदा देशभरातील 32 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुले पुरस्कार विजेते ठरले आहेत.
त्यामध्ये धाडशी कामगिरीचा शौर्य पुरस्कार – कामेश्वर जनन्नाथ वाघमारे (जि. नांदेड) याला मिळाला आहेत. तर नवनिर्माणासाठी – श्रीनभ अग्रवाल (नागपूर) आणि अर्चित राहूल पाटील (जळगाव) यांना पुरस्कार मिळाले आहे. त्याशिवाय शैक्षणिक प्रकल्पासाठी- सोनित सिसोलेकर (पुणे) आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी – काम्या कार्तिकेयन (मुंबई) यांना पुरस्कार मिळाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्वर वाघमारे या 14 वर्षीय बहादूर मुलाने आपल्या जीवाची पर्वा नदीत बुडणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता. या धाडसाचे मुख्यमंत्र्यांनी याआधीच कौतुक केले होते. या धाडसाबद्दल त्याला प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
“महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. हेच आपल्या मुलांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून सिद्ध केले आहे. बहादुरीच्या आणि लढवय्येपणात महाराष्ट्र मागे हटत नाही. तसाच तो नवनिर्माण आणि प्रयोगशीलतेतही पुढेच आहे. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच दिमाखदार राहिली आहे. या क्षेत्रात आपली नवी पिढीही तितक्याच उमेदीने आणि पुढे जात आहे. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बहादुरी आणि लढवय्येपणात महाराष्ट्र मागे हटत नाही. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच दिमाखदार राहिली आहे असे सांगून ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे,’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या मुलांचे कौतुकही केले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 25, 2021
“पुरस्कार प्राप्त या मुलांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे, असेही म्हणावे वाटते. पुरस्कारप्राप्त या मुलांमध्ये ही जिद्द आणि चिकाटी निर्माण करणारे त्यांचे कुटुंबीय, पालक तसेच शिक्षक, मार्गदर्शकही कौतुकास पात्र आहेत. त्यासाठी या सर्वांचे आणि पुरस्कार विजेत्या मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसही शुभेच्छा,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (CM Uddhav Thackeray Congratulate PM National Children’s Award winners)
संबंधित बातम्या :
वीजबील प्रकरणात मनसेची नवी भूमिका, राज ठाकरेंचे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश
रोहित पवारांनी नकलीपणा केला, कथित पुराव्यासह निलेश राणेंचा हल्ला