मुख्यमंत्र्यांना असे जोक करायची सवय, ‘ते’ वक्तव्य केवळ भाजपच्या समाधानासाठी; नाना पटोलेंचा खोचक टोला

| Updated on: Sep 17, 2021 | 4:23 PM

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादेतील भाषणानंतर राज्यात सर्वत्र शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत माध्यमांनी काँग्रेस नेते नाना पटोल यांच्याशी बातचित केली. यावेळी पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना असे जोक करायची सवय आहे.

मुख्यमंत्र्यांना असे जोक करायची सवय, ते वक्तव्य केवळ भाजपच्या समाधानासाठी; नाना पटोलेंचा खोचक टोला
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. हा सोहळा पार पडल्यानंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, MIM खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जोरदार टोलेबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फटकेबाजी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रावसाहेब दानवे यांचा उल्लेख भावी सहकारी असा केला. (CM Uddhav Thackeray makes jokes like this, that statement is only for the sake of BJP : Nana Patole)

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर राज्यात सर्वत्र शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा सुरु आहेत. याबाबत माध्यमांनी काँग्रेस नेते नाना पटोल यांच्याशी बातचित केली. यावेळी पटोले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना असे जोक करायची सवय आहे. भाजप सध्या तणावात आहे, म्हणून त्यांच्या समाधानासाठी मुख्यमंत्री बोलले असतील. ते कोणत्या अर्थानं बोलले हे फक्त मुख्यमंत्रीच सांगू शकतील. तसेच पटोले म्हणाले की, आम्ही सत्तेत बसताना आनंदाने आलोय, असं कधी बोललो नाही, केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं होतं म्हणून आम्ही सत्तेत आहोत. आमची 2014 साठी तयारी सुरु आहे. त्यासाठी आमचं काम सुरु आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना दिवसाढवळ्या सत्तेची स्वप्न पडत आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.

आमच्या स्टेशनवर येऊ शकता

इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या गोटात आनंद होईल असं वक्तव्य केलं. कारण रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.

इतकंच नाही तर मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता”

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

दरम्यान, या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनीही तुफान फटकेबाजी केली. आज 17 तारखेला आमचा स्वातंत्र्याचा दिवस उजाडला, स्वातंत्र्याच्या 1 वर्षांनी देशात विलीन होता आलं. 17 सप्टेंबर हा आम्ही स्वातंत्र्याचा दिवस साजरा करतो. ग्रामीण विकासाचा पाया म्हणजे जिल्हा परिषद आहे. मी या जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. त्यावेळी भाजप नव्हता जनता पक्ष होता, आणि नांगराच्या चिन्हावर मी निवडून आलो होतो. तेव्हा वाटायचं एक बिल्डिंग असावी ती आज पूर्ण झाली.

मला तेव्हा 65 रुपयांचा भत्त्याचा चेक मिळाला, मला चेक देताना मॅनेजर चेक देईन ते मला ओळखेना कारण मी सभापती असेन त्याला वाटत नव्हतं.

अब्दुल सत्तार यांनी काही मागण्या केल्या. मराठवाडा सध्या मागास नाही, आमच्या सरकारमध्ये सर्वात निधी उपलब्ध केला. समृद्धी महामार्ग, नांदेड महामार्ग सुद्धा आम्ही मंजूर केला.

सोलापूरपासून धुळ्यापर्यंत रेल्वे झाली नाहीतर रावसाहेब दानवे यांना मतदान करून नका असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. मग मी पण म्हणालो सिलोड जिल्हा झाला नाही तर अब्दुल सत्तार यांना मतदान करू नका, अशी फटकेबाजीही दानवेंनी केली.

मी 41 वर्षापासून राजकारणात आहे. 41 वर्षांपूर्वी स्टेजवर बसलेली एकही व्यक्त राजकारणात नव्हती. तुम्ही माझ्याकडून काही अपेक्षा ठेवता तशा मी पण काही अपेक्षा करतो. मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचं प्रेझेंटेशन आम्ही तयार केलं. फक्त 35 टक्के जमीन आम्हाला अधिक लागणार आहे. ते प्रेझेंटेशन घेऊन मी आपल्याला भेटणार आहे, त्याला परवानगी द्या, असं आवाहन रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं.

संबंधित बातम्या  

दानवे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे रहा, पुढचं मी बघतो, उद्धव म्हणाले, शब्द दिला!

मॅनेजर म्हणाला, दानवेंना बोलवा, रावसाहेब म्हणाले, ‘अहो मीच तो’, 65 रुपयांच्या चेकच्या किस्स्याने मुख्यमंत्रीही खळखळून हसले!

(CM Uddhav Thackeray makes jokes like this, that statement is only for the sake of BJP : Nana Patole)