मुंबई : अचानक ठरलेला दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा अचानकपणेच पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (18 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता पायाभरणी सोहळा होणार असल्याचं, काल सांगण्यात आलं होतं. मात्र एमएमआरडीएकडून आजचा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला केवळ 16 जणच निमंत्रित होते, त्यावरुन नाराजीचा सूर उमटत होता. आता हा कार्यक्रमच पुढे ढकलण्यात आला आहे. (CM Uddhav Thackeray to lay foundation of Dr Babasaheb Ambedkar Statue in Indu Mill Memorial)
सर्व विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची पुढील तारीख ठरवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच कार्यक्रम घोषित करु. अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संरचनेनंतर पादपीठ आणि पुतळ्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम नियोजित होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मंत्र्यांची नावं निमंत्रितांच्या यादीत होतं. नंतर या यादीत आनंदराज आंबेडकर यांनाही इंदू मिलमधील पायाभरणी सोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं.
इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले मात्र अशा महत्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा असे निर्देश मी दिले आहेत. त्यामुळे कुणीही या मुद्द्यावरून राजकारण करू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे, असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी यांनाच परवानगी देण्यात आली आहे.
आंबेडकर चळवळीतील कोणालाही आमंत्रित करण्यात आलेलं नाही, तसेच इतर मंत्र्यांना याची माहिती दिली नसल्याने नाराजीचा सूर असल्याचे बोलले जाते. त्यानंतर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांना इंदू मिलमधील पायाभरणी सोहळ्याचं आमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
रामदास आठवले यांची नाराजी
तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पायाभरणीसाठी आंबेडकर समाजातील नेत्याला महाराष्ट्र सरकारने निमंत्रण दिले नाही यावर आमची नाराजी असल्याची उघड भूमिका रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली. महाराष्ट्र सरकार पायाभरणीवरुन राजकारण करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये इंदूमिल येथील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही त्यावेळी उपस्थित होते.
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आनंदराज आंबेडकर आक्रमक झाले आहेत. याआधी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जर होत नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही वर्गणी काढून स्मारक बांधू, असं मत व्यक्त केलं होतं. (CM Uddhav Thackeray to lay foundation of Dr Babasaheb Ambedkar Statue in Indu Mill Memorial)
इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे असेल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट असेल. या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. तसेच स्मारकाचा चबुतरा 100 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे.
स्मारकाच्या निधीतही 400 कोटींची वाढ केली असून आता एकून 1100 कोटी निधी करण्यात आला आहे. तसेच या स्मारकाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी ही एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे. त्यासोबतच स्मारकात एक मोठं ग्रंथालयही असणार आहे. विशेष म्हणजे येथे चवदार तळ्याची प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे. हे स्मारक दोन वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे.
पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे आणि लोखंडाचे प्रमाण वाढेल. तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय आणि प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये 6 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील.
या स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच 1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.
VIDEO : SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 18 September https://t.co/AFaLooNck9
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2020
संबंधित बातम्या :
इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाला माझा विरोध, पैसे वाडियाला द्या : प्रकाश आंबेडकर
आंबेडकर स्मारक होत नसेल तर आम्हाला सांगा, वर्गणी काढून बांधू : आनंदराज आंबेडकर
आव्हान स्वीकारलं तर दोन वर्षात आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण होईल : शरद पवार
(CM Uddhav Thackeray to lay foundation of Dr Babasaheb Ambedkar Statue in Indu Mill Memorial)