मुंबई : मुंबईकरांना आता घरात पाणी भरण्याचं विशेष कौतुक उरलेलं नाही. दरवर्षी मुंबई तुंबण्याचे (Flood in Mumbai) प्रकार होत असल्यानं अनेकजणांनी ही गोष्ट स्वीकारली आहे. मात्र 2005 साली 26 जुलै (26 July Rains in Mumbai) रोजी झालेल्या पावसानं मुंबईकरांना फक्त थांबवलंच नाही तर हादरवून सोडलं होतं. 26 जुलैच्या पावसाच्या आठवणी आजही अनेकांच्या अंगावर काटा आणतात. दरम्यान, 2005 साली झालेल्या या पावसाची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांनी बोलून दाखवली आहे. 2005 साली मुंबईत माझ्याही घरात पाणी पुराचं पाणी शिरलं होतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुंबई वातावरण कृती आराखडा अहवाल लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. यावेळी कृती आराखडा अहवाल बनवणाऱ्या संपूर्ण सहकाऱ्यांचं त्यांनी यावेळी अभिनंदनही केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना अनेकांनी आपण वांद्रे कलानगरला राहायला आल्यानंतर चिडवल्याचं म्हटलंय. कलानगरला राहायला आलो तेव्हा चौफेर खाडी होती. तेव्हा आम्हाला लोकं जंगलात राहायला गेलो, म्हणून चिडवायचे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तेव्हा आजूबाजूला खाडी होती. मॅन्ग्रोव्ह आपण गमावली असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. पहिला पाऊस पडल्यानंतर आधी मातीचा सुगंध यायचा. पण आता मुंबईत मातीच नाहीत राहिली, असंही ते म्हणालेत. वाढत्या काँन्क्रिटीकरणावरुन त्यांनी टोलाही लगावला. मग याला विकास मानायचा का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
वाढत्या काँन्क्रिटीकरणामुळे पाणी मुरायला मातीच नाही. आता पाणी अनेकांच्या घरात शिरायला लागलंय. 2005 साली झालेल्या पावसानं माझ्याही घरात पाणी शिरलं होतं, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आपल्याला अतिवृष्टीचा इशारा मिळतो, त्याची तीव्रता कुणीच ठरवू शकत नाही, असंही ते म्हणालेत. दरम्यान, 2050 पर्यंत मुंबईचे महत्त्वाचे चार भाग पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर नरीमन पॉईन्टचा 80 टक्के भाग पाण्याखाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आतापासूनच खबरदारीची पावलं उचलायला हवी, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय.
‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या’, ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची मागणी!
‘फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष’, संजय राऊतांचा पलटवार; खोटं न बोलण्याचाही सल्ला!
VIDEO | महाराष्ट्रात बदल्यांचा महाघोटाळा; रसद केंद्रीय गृहसचिवांना दिली, फडणवीसांचा धमाका!