डोंबिवली: डोंबिवलीत (Dombivali) कमर्शिअल गॅस सिलिंडरमधून (Commercial gas cylinder) गॅस चोरून घरगुती सिलिंडरमध्ये भरत काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या (Police Action) ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एक टेम्पो आणि गॅस चोरी करण्याच्या साहित्यासह सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हेदुटणे नावाचे गाव आहे. या गावाच्या हद्दीत एका वीटभट्टीच्या मागे गॅस चोरीचा काळाधंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळं मानपाडा पोलिसांनी या व्हिडिओत दिसणाऱ्या टेम्पोच्या मालकाचा पत्ता काढत त्याला ताब्यात घेतले.
टेम्पो चालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, आपण आपला टेम्पो या गॅस चोरांना भाड्याने दिला होता, मात्र ज्यावेळी हे बेकायदेशीर कृत्य करत असल्याचं समजले, त्याचवेळी आपण टेम्पो भाड्याने देणं बंद केल्याचेही त्याने सांगितले.
टेम्पो मालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी डोंबिवलीतून बाळाप्पा इरगदीन आणि महेश गुप्ता या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी पोलिसांना गॅस चोरीची कबूली दिली असून हे दोघंही कमर्शिअल गॅस सिलिंडरमधून नोझल आणि पाईपच्या साहाय्याने गॅस चोरायचे आणि घरगुती गॅस सिलिंडरमध्ये भरत होते. यानंतर हे घरगुती गॅस सिलिंडर चढ्या भावाने गरजूंना विकायचे, अशी माहितीही मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली आहे.
अटक केलेल्या बाळाप्पा इरगदीन आणि महेश गुप्ता या दोघांकडून पोलिसांनी 12 सिलिंडर, नोझल, 2 मोबाईल आणि एक टेम्पो जप्त केला आहे. या दोघांसोबतच अन्य कोणते गॅस चोरीचे रॅकेट ग्रामीण भागात सुरू आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.