मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसुलीचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या आरोपानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीये. अॅड. जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी ही तक्रार दिली आहे. ” भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावे,” अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केलीये. (complaint registered against Anil Deshmukh under corruption allegations)
“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं असून त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा केला आहे. या पत्रात सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे पुरावे आहेत,” असं पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटंलय. तसेच, यामध्ये मास्टरमाईंट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार आणि सचिन वाझे हे आहेत, असा आरोपीही पाटील यांनी आपल्या लेखी तक्रारीमध्ये केलाय.
यावेळी जयश्री पाटील यांनी या प्रकरणात मोठे नेते असले तरी कोणाचीही गुन्ह्यातून सुटका करता येत नाही, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याचे सांगितले. तसेच, अनिल देशमुख, सचिन वाझे, शरद पवार यांच्या संदर्भातील संभाषणाचे पुरावे जतन होणे गरजेचे असल्याचेसुद्धा पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे स्वत:च गृहमंत्री असल्यामुळे कारवाई होत नसल्यचं पाटील यांनी म्हटलंय. “जेव्हा एखादा प्रकार निदर्शनास येतो. तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून तत्काळ गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. मात्र, या गुन्ह्यामध्ये तशी कारवाई होताना दिसत नाही. आरोपी हे स्वत: गृहमंत्रालयाचे प्रमुख आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे पुढारी आहेत. त्यामुळे कायदेशी प्रक्रिया पार पाडली गेली नाही. किंवा परमबीर सिंग यांनी तशी हिम्मत दाखवली नाही. त्यामुळे सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणामध्ये संबंधितांविरुध गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे,” असा आरोप पाटील यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे.
दरम्यान, पाटील यांनी तक्रार दाखल केली असली तरी, देशमुख यांच्याविरोधत अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. पाटील यांच्या तक्रारीनंतर आता मुंबई पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर बातम्या :
नवी मुंबईत ‘जम्बो कोव्हिड लसीकरण केंद्र’, पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचं ‘मिशन लसीकरण’ जोरात!
गृहमंत्री अनिल देशमुखांचीही चौकशी होणार का?; देवेंद्र फडणवीसांचा पवारांना सवाल
(complaint registered against Anil Deshmukh under corruption allegations)