Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा? काँग्रेसचं ठरलंय!

| Updated on: Jun 26, 2024 | 10:33 PM

दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली आणि या बैठकीत विधानसभा निवडणुका एकत्रच लढण्याचं ठरलं. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल हे काँग्रेसच्या बैठकीमध्ये ठरलं आहे. नेमकं काय ठरलंय टीव्ही9 मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घ्या.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोणाचा? काँग्रेसचं ठरलंय!
Follow us on

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा कौल, महाविकास आघाडीच्या बाजूनं आल्यानंतर काँग्रेसची दिल्लीत हायकमांडसोबत बैठक झाली. ज्यात काँग्रेसनं महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेस मविआ म्हणून एकत्र विधानसभेच्या निवडणुका लढेल, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आधीच दिला जाणार नाही. विधानसभेच्या निकालानंतर ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री हे काँग्रेसनं ठरवलंय. जुलै महिन्याच्या अखेरीस जागा वाटप पूर्ण व्हावं असं काँग्रेसच्या बैठकीत ठरलंय.

काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना अशा 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसनं भूमिका स्पष्ट केल्याची माहिती आहे, ज्याची संख्या अधिक त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल. 2019 मध्ये निकालानंतरच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन भाजप आणि उद्धव ठाकरेंमध्ये फिस्कटलं. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र आता, मुख्यमंत्रिपदावरुन वाद नको म्हणून ज्याचे अधिक आमदार त्याचाच मुख्यमंत्री असा फॉर्म्युला काँग्रेसनं समोर ठेवलाय.

दिल्लीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील आणि नवनिर्वाचित काँग्रेसच्या खासदारांसोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. या बैठकीनंतर, जागा वाटपावर वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवरही एक बैठक व्हावी, अशी इच्छा पटोलेंनी व्यक्त केलीय. राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये जागा वाटपावर एक बैठक व्हावी, असं पटोलेंना वाटतंय. त्याचं कारण म्हणजे काँग्रेसला जागा वाटपात चांगला वाटा हवा आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला 21 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 9 जागा जिंकल्या. मात्र काँग्रेसनं 17 पैकी 13 जागा निवडून आणल्या.

पाहा व्हिडीओ:-

सध्या महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला चर्चेत आहे, तो समसमान जागांचा आहे. काँग्रेस 96 जागा. ठाकरे गट 96 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 96 जागा आणि मित्र पक्षांना आपआपल्या कोट्यातून जागा सोडाव्यात . दुसरा फॉर्म्युला आहे, तिन्ही पक्षांना प्रत्येकी 93 जागा आणि छोट्या मित्र पक्षांसाठी 9 जागा सोडायच्या. पटोलेंप्रमाणं अधिक जागांची अपेक्षा जयंत पाटलांनाही आहे..त्यामुळंच मेरिटनुसार जागा वाटप व्हावं असं जयंत पाटीलही म्हणतायत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं संविधानाचा मुद्दा लावून धरला. महागाई, गुजरातला गेलेले उद्योगधंदे, शेतकरी, जीएसटी आणि भ्रष्टाचार हा विषय विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी गाजवणार आहे. त्याची झलक शेवटचं अधिवेशन सूरु होण्याच्या पूर्वसंध्येला दिसली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोस्टरबाजीतून विरोधकांनी सरकारला घेरलं.