Eknath Gaikwad: काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन

| Updated on: Apr 28, 2021 | 11:53 AM

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad)यांचं निधन झालं.

Eknath Gaikwad: काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन
Eknath Gaikwad
Follow us on

मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांचं निधन झालं. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ गायकवाड हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. (Congress Leader and ex MP Eknath Gaikwad died due to corona )

ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी १०.०० वाजता कोरोनामुळे त्यांचं  निधन झाले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार होतील, अशी माहिती आहे.

एकनाथ गायकवाड यांची राजकीय कारकीर्द

कनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.

जायंट किलर ठरले

एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, नंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.

राहुल गांधींसाठी एकनाथ गायकवाड यांनी दिलेला जामीन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात शिवडी कोर्टात सुनावणी सुरु होती. त्यावेळी राहुल गांधी कोर्टात हजर राहिल्यानंतर राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलं होतं. 15 हजाराच्या हमीनंतर कोर्टाने राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलेलं. मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी राहुल गांधींसाठी कोर्टात हमी दिली होती.

एकनाथ गायकवाड यांची कारकीर्द

  • धारावी विधानसभा मतदारसंघ: 1985-1990, 1990-1995, 1999-2004 तीन टर्म आमदार
  • मंत्री म्हणून कार्य :1999 ते 2004 या कालावधीत सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री
  • दोन टर्म खासदार : दक्षिण मध्य मुंबई नतदारसंघातून 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014 या दोन टर्म खासदार

संबंधित बातम्या: 

‘मुंबईच्या वाट्याला जाऊ नका’, एकनाथ गायकवाड यांचा मोदी सरकारला इशारा

राहुल गांधींना शिवडी कोर्टाकडून जामीन, काँग्रेसच्या माजी खासदाराची कोर्टात हमी

(Congress Leader and ex MP Eknath Gaikwad died due to corona)