मुंबई : सरकार अडचणीत नाही, सरकार भक्कम आहे. राज्यात सरकार अस्तित्वात आहे अजून. त्यामुळे कुणाला हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळण्याच्या स्थितीत आहे. या राजकीय प्रसंगाचा भाजपा पुरेपूर फायदा घेत असून अॅक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहे. त्यांनी आता राज्यपालांना पत्र पाठवले असून राज्यात अंदाधूंद कारभार सुरू आहे. तेव्हा लक्ष घालण्याची मागणी या पत्राद्वारे भाजपाने केली आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर (Maharashtra BJP) टीकास्त्र सोडले आहे. राज्यात अजून सरकार आहे. त्यामुळे राज्यपालांच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भाजपावर टीका करताना आणि सरकारची भूमिका स्पष्ट करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, की कोणत्या पक्षाने काय मागणी करायची हा त्यांचा प्रश्न आहे. जोपर्यंत सरकार अल्पमतात आहे, हे सिद्ध होत नाही, तो सरकार अस्तित्वात आहे, हेच सिद्ध होते. अशास्थितीत कामे थांबली जात नाहीत. जनतेच्या हिताची कामे करताना दे निर्णय सरकारला घ्यावे लागतात, ते निर्णय घेण्याची प्रक्रिया तर सुरूच आहे. शासन कधी बंद पडतात काय, असा सवाल करत पक्षाच्या सत्ता बदलू शकतात. मात्र शासन, सरकार म्हणून जनतेची जी रुटीन कामे आहेत, ती सरकारला, प्रशासनाला करावीच लागतात.
शरद पवार यांचा राजकीय प्रवास, प्रदीर्घ राजकीय अनुभव असल्यामुळे ते आता मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्याविषयी चर्चा करण्याचा हा विषयच नाही. त्यांची आज जी भूमिका आहे, त्याला काँग्रेसचे पूर्ण समर्थन आहे, असे ते म्हणाले. संख्याबळ आणि बहुमत याविषयी आत्ता काहीच सांगू शकत नाही. त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. मात्र काँग्रेस म्हणून हे सरकार टिकवणे, लोकहिताची कामे करणे आणि राज्याला दिशा देणे ही काँग्रेसची भूमिका आहे. तर बहुमत गमावले, सरकार गेले तर आमची विरोधी बाकावर बसण्याची तयारी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.