महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यात विविध राजकीय पक्षांच्या रॅली आणि राजकीय नेत्यांचे दौरे सुरु आहेत. अशातच काँग्रेसचा तरूण चेहरा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचे मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी हे अजित पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. राष्ट्रवादीची ‘जनसन्मान यात्रा’ आज मुंबईत असणार आहे. या यात्रेत झिशान सिद्दिकी सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीची ‘जनसन्मान यात्रा’ आज मुंबईत असणार आहे. नवाब मलिक यांच्या मतदारसंघात आज ही यात्रा असेल. चेंबुरच्या देवनार आगाराजवळ ‘जनसन्मान यात्रा’ पोहोचणार आहे. या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन नवाब मलिक यांनी केलं आहे. या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दिकी सहभागी होणार आहेत. दरम्यान लवकरच झिशान सिद्दिकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
झिशान सिद्दिकी हे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून 2019 ला त्यांनी निवडणूक लढवली. यावेळी मातोश्रीच्या अंगणात त्यांनी मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा त्यांनी पराभव केला होता. युवा आमदार म्हणून झिशान सिद्दिकी यांची ओळख आहे. शिवाय वांद्र्यातील तरूणवर्ग त्यांना मानणार आहे. मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदही झिशान यांनी सांभाळलं आहे. त्यामुळे झिशान सिद्दिकी अजित पवार गटात जात असतील तर मुंबई काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.
झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी काही दिवसांआधी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांना राज्यसभेचं तिकीट दिलं जाणार असल्याचीही चर्चा आहे. वडील अजित पवार गटात असल्याने झिशान सिद्दिकी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आज जनसन्मान यात्रेतही झिशान सिद्दिकी सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात आहे. आता आगामी काळात काय घडामोडी घडतात? हे पाहावं लागेल.