मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar)यांचे शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,एक मुलगा,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच रावसाहेब अंतारपूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरु होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. (Congress MLA Raosaheb Antapurkar no more)
प्राथमिक माहितीनुसार, साधारण 25 दिवसांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यावर नांदेडच्या भगवती रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 12 दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रावसाहेब अंतापूरकर यांना मधूमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यांच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळत होते. दरम्यानच्या काळात त्यांना हृदयविकाराचा एक झटकाही येऊन गेला होता.
माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले.
आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना. pic.twitter.com/WxNc51ovsO— Ashok Chavan (@AshokChavanINC) April 9, 2021
सामान्यांचा आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. देगलुर तालुक्यातील अंतापूर येथील रावसाहेब अंतापूरकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देगलुर मानव्य विकास शाळेत झाले. त्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 2009 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी बाजी मारली. तर 2019 मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणेंचा पराभव केला होता.
कोरोनाच्या काळातही त्यांच्या कामात खंड पडला नव्हता. अगदी शेती- बांध्यावर, वाडी-तांड्यावर जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते. अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे एक हळव्या मनाचा आमदार आपल्यापासून हिरावला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
(Congress MLA Raosaheb Antapurkar no more)