मुंबई | टोलच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच पेटलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टोलमाफीच्या विधानानंतर आणि राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसैनिकांनी टोलनाक्यावर देवेंद्र फडणवीस यांचा व्हीडिओ वाहनचालकांना दाखवत त्यांची जनजागृती केलीय. तसेच त्यांना टोल न देता टोलनाक्यावरुन पाठवलंय. त्यानंतर आता काँग्रेसने यात उडी घेत मोठी मागणी केली आहे. टोलचा पैसा नक्की कुठे जातो, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
“राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल वसुलीत झालेल्या भ्रष्टाचाराचीच कबुली दिली आहे. देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना समजा चारचाकी वाहनांना राज्यातील सगळ्या टोलनाक्यांवर टोल माफ झाला असेल, तर एवढी वर्षं राज्यभरातील लाखो खासगी चारचाकी वाहनचालक-मालक यांच्याकडून टोल घेतला जातो, तो नेमका कोणाच्या खिशात जातो?”, असा प्रश्न या निमित्ताने वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.
“दर दिवशी टोलच्या माध्यमातून जमा होत असलेली शेकडो कोटींची रक्कम कुठे जाते? एवढा टोल भरूनही राज्यातील रस्त्यांची अवस्था एवढी बिकट का, राज्यातील लोकांना रस्त्यांवर, राज्य महामार्गांवर अगदी पायाभूत सुविधादेखील उपलब्ध का नसतात, या प्रश्नांची उत्तरंच फडणवीस यांनी आपल्या कबुलीतून दिली आहेत. हा पैसा नेमका कुठे जातो, याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी आणि केंद्रातील ED प्रिय भाजप सरकारने महाराष्ट्रातल्या जनसामान्यांच्या हिताच्या या प्रश्नावर संबंधितांवर कठोर कारवाई करावी” अशा शब्दात वर्षा गायकवाड यांनी टीकाही केली.
टोलबाबत काँग्रेसची भूमिका काय?
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल वसुलीत झालेल्या भ्रष्टाचाराचीच कबुली दिली आहे. फडणवीस सत्तेत असताना समजा चारचाकी वाहनांना राज्यातील सगळ्या टोलनाक्यांवर टोल माफ झाला असेल, तर एवढी वर्षं राज्यभरातील लाखो खासगी चारचाकी वाहनचालक-मालक यांच्याकडून टोल घेतला जातो, तो… pic.twitter.com/fB6iojmRVw
— Mumbai Congress (@INCMumbai) October 9, 2023
दरम्यान राज ठाकरे यांच्या आदेशनांतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल आणि वाशी टोल नाक्यावर वाहन विनाटोल सोडली. या दरम्यान पोलिसांशी बाचाबाचीही झाली. दरम्यान आता मनसैनिक वाशी, मुलंड टोलनाक्यानंतर आता दहिसर टोलनाक्यावर जाणार आहेत. दहीसर टोलनाक्यावर वाहनं ही टोल घेऊन की विना टोल सोडली जात आहेत, याची पाहणी मनसैनिक करणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ दाखवून ते तीनचाकी, दुचाकी आणि चारचाकी चालकांना टोल न भरण्याबाबत सांगणार आहेत.