मुंबई : मुंबईत (Mumbai Corona Update) कोरोना विषाणू बाधित रुग्णांची (Corona update) संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला आणि सर्व संबंधित विभाग व खात्यांना दक्ष राहण्याचे निर्देश महानगरपालिका (BMC) आयुक्त यांनी दिले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा खंबीरपणे सामना करतानाच मुंबई महानगरात कोविड प्रतिबंधक लसीकरण देखील वेगाने करण्यात आले आहे. विविध घटकांपर्यंत लसीकरण मोहीम पोहोचल्याने कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव अतिशय सौम्य स्तरावरच रोखण्यात महानगरपालिकेला यश आले आणि काही दिवसातच कोरोना रुग्णांचा आकडा घसरला, सद्यस्थितीत जगातील विविध देशांमध्ये कोविडचे नवीन उपप्रकार आढळले असून संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई महानगरात देखील अलीकडे कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढते आहे. तरी गाफील न राहता काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत.