नवी मुंबई : अनधिकृत बिल्डिंग बांधून फ्लॅट विक्री करणाऱ्या बिल्डरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृपेने नवी मुंबई महापालिकेची तिजोरी ताब्यात मिळाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिघा येथील नगरसेवक नवीन गवते यांनी बाजी मारली. गवते आणि त्यांच्या कुटुंबावर महापालिका, एमआयडीसी आणि वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृतपणे इमारती बांधून फ्लॅट विक्री केल्याचा आरोप आहे.
मुंबई उच्च न्यायालयात गवते यांच्यावरील आरोप सिद्ध झाले होते, शिवाय ते काही काळ फरारही होते, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राजीवकुमार मिश्र यांनी केलाय. तरीही राष्ट्रवादीकडून नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्याच गवते यांच्या हातात देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रवादीकडून दिघा येथील नगरसेवक नवीन गवते आणि शिवसेनेकडून ज्ञानेश्वर सुतार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणुकीत नवीन गवते यांना 9, तर ज्ञानेश्वर सुतार यांना 7 मते मिळाली. काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नवीन गवते यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचा विजय सुकर झाला. विधानसभेत शिवसेनेला मिळालेल्या जोरदार मतदानामुळे बॅकफूटला गेलेल्या राष्ट्रवादीला या विजयामुळे काहीसा दिलासा मिळालाय.
दोन वर्षांपूर्वी दिघा येथील मोरेश्वर अपार्टमेंटचे बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते यांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. वाशी न्यायालयात शरण आल्यानंतर कोर्टाने नवीन गवतेंना रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. अनधिकृत बांधकामप्रकरणी गवतेंविरुद्ध पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.