मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) जवळपास गेल्या वर्षभरापासून अटकेत आहेत. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत. नवाब मलिक यांच्या वकिलांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने मलिकांची कारागृहातून सुटका व्हावी, त्यांना जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण त्यांच्या पदरात निराशाच पडताना दिसत आहे. नवाब मलिक यांना आजही कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. याउलट त्यांच्या जेलमधील मुक्कामास आणखी 14 दिवसांची वाढ झाली आहे. त्यामुळे मलिकांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. नवाब मलिक हे आधीच आजारपणामुळे त्रस्त आहेत. असं असताना त्यांच्या जेलमधील मुक्काम वाढल्याने त्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे.
नवाब मलिक यांच्याविरोधात कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केलाय. याच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मलिक यांची जेलमधून सुटका व्हावी यासाठी त्यांच्या वकिलांकडून प्रयत्नांची पराकष्ठा करण्यात येते. कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात येतोय. पण तरीही मलिकांना दिलासा मिळताना दिसत नाहीय. याशिवाय मलिक आजारी आहेत. त्यांच्यावर सध्या कोर्टाच्या परवानगीनुसार कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. असं असताना त्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांकडून प्रयत्न केले जात आहेत. पण आजही मलिकांच्या हाती निराशाच पडली आहे.
नवाब मलिक यांच्या कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. कोर्टाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ केली आहे. कोर्टाने त्यांना 2 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे हा नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. याआधी मलिक यांचे पक्षातील सहकारी माजी मंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यांनादेखील तब्बल वर्षभर जेलमध्ये राहावं लागलं होतं. त्यानंतर त्यांची जेलमधून सुटका झाली होती. त्यामुळे आता मलिकांची सुटका कधी होईल? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे.
या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते.
मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे.
नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. मात्र नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.