मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. राज्यात रविवारी आणि सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये भलतीच वाढ झाली.रविवारी जवळपास साडे तीन हजार कोरोना रुग्ण आणि सोमवारी 3 हजार 365 नवे रुग्ण मिळाले. पाठीमागच्या दोन आठवड्यांत जवळपास 21 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग जडला आहे. यावरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप व्हायला सुरुवात झाली आहे, याचा अंदाज येतो. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. (Covid 19 Another Lockdown in Maharashtra)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता आहे. जर कोरोनाचा असाच प्रकोप कायम राहिला तर पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल का? लॉकडाऊन केलं तर कोणत्या भागांत केलं जाईल? त्याची रुपरेशा काय असेल? असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत.
संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागेल, याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु सीमित लॉकडाऊन केला जाऊ शकतो. ठराविक भागांमध्ये लॉकडाऊन करायचं झाल्यास ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा शहरांमध्ये कोरोनाच्या अधिक केसेस आहेत तिथे लॉकडाऊन होऊ शकतं. जसं की पुणे, नाशिक, अमरावती, वर्धा, मुंबई….
असंही होऊ शकतं की संपूर्ण जिल्ह्यात किंवा शहरात लॉकडाऊन लावण्याऐवजी फक्त जिथे कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, तिथेच लॉकडाऊन केलं जाऊ शकतं.
मध्य मुंबईच्या कुर्ल्यातलं नेहरु नगर, तिलक नगर, विक्रोळी, घाटकोपरला डेंजर झोन म्हणून गणलं जाऊ लागलंय. या विभागांना प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊ शकतं. मुंबई पश्चिममध्ये ब्रांदा, खार, अंधेरी, जोगेश्वरी (पूर्व) या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या क्षेत्रांना देखील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊ शकतं.
महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीच्या दिवशी 3800 कोरोना केसेस समोर आल्या. त्यानंतर डिसेंबर, जानेवारीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. परंतु आता फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोना केसेस वाढल्याचं समोर येतंय. त्यामुळे लोकांमध्ये लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा आहेत.
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्याचं आकड्यांवरुन लक्षात येतंय. लोकं कोरोनाला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. लोकं मास्क वापरत नाहीत. जरं हे सगळं असंच सुरु राहिलं तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन कठोर निर्णय घ्यावे लागतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले.
11 महिन्यांपासून बंद असलेली लोकल सरकारच्या आदेशने पुन्हा सुरु झाली. परंतु लोकल सुरु झाल्यानंतर मुंबईत कोरोना केसेस वाढल्याचं समोर आलं आहे. जर येत्या 5 ते 10 दिवसांत असेच वाढलेले आकडे बघायला मिळाले तर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा निर्बंध लादले जाऊ शकतात. मुंबई महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या म्हणण्यानुसार 22 फेब्रुवारीला या पार्श्वभूमीवर एका विशेष बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्या कारणाने जसंजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसंतसं निर्बंध हटवले गेले. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. अर्थव्यवस्थेची गाडी आता कुठे रुळावर यायला सुरुवात झाली आहे. अशात लॉकडाऊन न करता जनतेवर काही निर्बंध लादले जाऊ शकतात.
(Covid 19 Another Lockdown in Maharashtra)
हे ही वाचा :
कोरोना संसर्ग वाढला, पुण्यात खासगी रुग्णालयात 50 टक्के बेड्स आरक्षित, अकोला जिल्ह्यात संचारबंदी