मुंबईः खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याची तक्रार त्यांनी पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे याविषयावरून हे राजकारण तापले आहे. संजय राऊत यांच्या या तक्रारीबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संजय राऊत यांनी जी तक्रार दिली आहे ती तक्रार सुरक्षेसाठी दिले आहे की, सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे त्याची चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या तक्रारीबद्दल बोलताना सांगितले की, सुरक्षा व्यवस्थेचा विषय घेऊन तो राजकारणाशी जोडणं चुकीचे आहे.
मात्र संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत.
कधी 2 हजार कोटीचा आरोप करतात तर कधी सुरक्षा व्यवस्थेतवरून ते सरकारवर चुकीच्या पद्धतीने आरोप करत आहेत. मात्र ते चुकीचे असून त्यांना जर हे सहानुभूतीसाठी मिळवायचे असेल तर त्याकडे लोकं चुकीच्या नजरेने बघत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कोणत्याही नेत्याला सुरक्षा देण्याचं काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करीत नाहीत तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती नेमलेली असते.
ती समिती त्या त्या नेत्याचे सर्वेक्षण करून सुरक्षेच्या संदर्भात निर्णय घेत असते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवरून राजकीय आरोप करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांना सध्या प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे रोज नवीन आरोप करतात. त्यांच्या या आरोपांना याआधी आम्ही उत्तर देत होतो मात्र आता त्यातील गांभीर्य निघून गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. असे आरोप केल्यामुळे कधी तरी त्यांच्यावर चौकशी लागण्याची शक्यता असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीमुळे आता राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनीही याबद्दल चौकशी करून पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्यांनी संजय राऊत यांनी ही स्टंटबाजी करत असल्याचे म्हणत त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.