मुंबई : वंचित बहुजन विकास आघाडीची शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत युती झाली. वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, अजून मी महाविकास आघाडीचा भाग झालो नाही. आणि माझी होण्याची इच्छा नाही. माझी युती ही शिवसेनेबरोबरची आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, असंही आंबेडकर यांनी म्हंटलं. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावरून काही सवाल निर्माण झाले. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नको. मग, ठाकरे का हवेत? महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. मग, ठाकरे यांच्याशीचं युती कशी?
प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळं मतदार गोंधळणार नाही का? वंचित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात उमेदवार देणार का? महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसोबत पटत नसेल, तर भाजपशी कसं लढणार?
याबाबत संजय राऊत म्हणाले, आमची अशी इच्छा आहे की, प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक होतील. ही प्रक्रिया होणार असेल, तर या आघाडीतील प्रमुख नेत्यांविषयी सगळ्यांना आदर ठेवला पाहिजे.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं की, हा विषय महाविकास आघाडीचा नाही. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा विषय आहे. त्यांच्यात महाविकास आघाडी हा विषय नव्हताच.
जुळायचं असेल तर पूर्णपणे जुळलं पाहिजे. बघायचं डावीकडं आणि हात टाकायचा उजवीकडं असं असेल, तर ते मला चालत नाही, असा प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलं.
जितेंद्र आव्हाड यांनी चांगलंच सुनावलं. शरद पवार यांच्याबद्दल कोणी काही बोलत असेल, तर ते खपवून घेतलं जाणार नसल्याचं आव्हाड म्हणाले. मी ३५ वर्षांच्या राजकीय जीवनात फक्त तीन वर्षे सत्ता भोगली. ३२ वर्षे रस्त्यावर गेल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं.