मुंबईः ठाणे जिल्ह्याच्या (Thane District) ग्रामीण भागात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था (law and order) अबाधित राहावी या करिता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 30जून पर्यंत जमाव बंदीचे आदेश (Curfew Order) दिले आहेत. तसेच या काळात नागरिकांना एकत्र येऊन सार्वजनिकरित्या घोषणा देणे, सुरक्षितता धोक्यात येईल येईल, अशा प्रकारची भाषणे करणे या गोष्टींवर मज्जाव असल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी पक्षविरोधात बंड पुकारल्याने राज्यभरात शिंदे यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या विरोधात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे जिल्ह्यात कधीही शिंदे यांच्या समर्थनार्थ किंवा विरोधात जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता असल्यानेच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
या दोन्ही प्रतिक्रियांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यकक्षेतील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शांतता आणि कायदा सुव्यस्था अबाधित राहावी या साठी 30 जूनपर्यंत पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच आता मुंबईमध्ये 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये काही अपवादात्मक बाबींना सूट देण्यात आली असून लाऊडस्पीकर वैगेरे या गोष्टींवरही बंदी घालण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये जमाव बंदीचे आदेश देण्यात आले असले तरी त्यातून काही गोष्टींना सूट देण्यात आली आहे.
राज्यातील राजकीय वातावरणामुळे मुंबई, ठाणे, पुणे, भंडारा, कोल्हापूर आदी ठिकाणी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांविरोधात जोरदान निदर्शने चालू केली आहेत. मुंबईतील सदा सरवणकर, पुण्यात तानाजी सावंत तर कोल्हापूरातही काल शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. पुण्यातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसैनिक हल्ला करत कार्यालयाची तोडफोड केली आहे. त्या पार्श्वभूमीवरच मुंबईमधील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जमाव बंदीचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.