मुंबईपासून 200 किलोमीटरवर ‘वायू’, कोकण किनारपट्टीवर परिणाम जाणवणार

| Updated on: Jun 12, 2019 | 8:05 AM

भारतच्या पश्चिम किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात वायू चक्रीवादळ 200 किमी सागरी अंतरावरुन पुढे कोकण किनारपट्टीच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

मुंबईपासून 200 किलोमीटरवर वायू, कोकण किनारपट्टीवर परिणाम जाणवणार
Follow us on

मुंबई : भारतच्या पश्चिम किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू चक्रीवादळ आज (12 जून) 200 किमी सागरी अंतरावरुन पुढे कोकण किनारपट्टीच्या दिशेने सरकणार आहे. वायू वादळादरम्यान मुंबईत जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टीला वायू वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आज (12 जून) सकाळपासूनच मुंबई, ठाणे, पालघर या परिसरात वारे वाहत आहेत, त्यामुळे राज्यात वायू वादळाचे परिणाम दिसत असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहे. त्याशिवाय वायू चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या ठिकाणी 30-40 किमी वेगाने विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्याजवळील घरांना आणि कच्च्या बाधंकामांनाही यामुळे धोका आहे. अशी बांधकामं पडू शकतात, विजेचे खाबं उखडून ताराही गळून पडण्याची शक्यता आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. अनेक पर्यटक अलिबागसह रायगड आणि कोकणातील विविध समुद्र किनारी पर्यटनाला गेलेली असून त्यांनाही काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय मच्छिमारांनाही दोन दिवस मासेमारी न करण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

राज्यात ताशी 90 ते 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्राच्या जवळील उत्तर पूर्व भागात ताशी 115 किमी वेगानेही वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सून लांबणीवर

दरम्यान वायू वादळामुळे राज्यात मान्सून मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र मान्सून आगमनासाठी येत्या आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गुजरातमध्ये शाळांना सुट्टी

तर उद्या (13 जून) गुजरातमध्ये वायू चक्रीवादळ धडकणार आहे. त्यादृष्टीने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 13 ते 15 जूनपर्यंत राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.