मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला, कुठे असणार सर्वात मोठी दहीहंडी? किती लाखांचे बक्षीस? जाणून घ्या

| Updated on: Aug 27, 2024 | 9:10 AM

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगणार आहे.

मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला, कुठे असणार सर्वात मोठी दहीहंडी? किती लाखांचे बक्षीस? जाणून घ्या
Follow us on

Dahi Handi 2024 : ‘गो गो गो गोविंदा… गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा जयघोष सध्या मुंबईसह संपूर्ण ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात पाहायला मिळत आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. तर त्यांना फोडण्यासाठी दहीहंडी पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. मुंबईत दादरमधील आयडिअल, जांभोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनी या ठिकाणी मोठ्या दहीहंडी पाहायला मिळत आहे. तसेच यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत. यावेळी लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

मुंबईत कुठे-कुठे मोठ्या दहीहंडी?

दादर आयडीयल दहीहंडी – यंदा ही दहीहंडी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रक मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण विषयावरील पथनाट्यही इथे सादर करण्यात येणार आहे. आयडियल बुक डेपो चौकात सेलिब्रेटी हंडी आयोजित करण्यात आली आहे. या ठिकाणी महिला दहीहंडी, अंध व्यक्तींची दहीहंडी, दिव्यांगांची दहीहंडी होणार आहे.

वरळी जांबोरी मैदान – मुंबईतील वरळी येथील जांभोरी मैदानात यंदा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे नेते संतोष पांडे यांच्या वतीने परिवर्तन दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. परिवर्तन दहीहंडी उत्सवात “अफजलखान वध” हा देखावा विशेष आकर्षण ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित राहणार आहेत.

प्रकाश सुर्वे, बोरिवली – बोरिवली माघाठणे परिसरात प्रकाश सुर्वे यांची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. यात लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या दहीहंडीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कलाकार विकी कौशल, गोविंदा, करिष्मा कपूर, अमृता खानविलकर, नृत्यकलाकार गौतमी पाटील, राधा पाटील यांसह विविध सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत.

घाटकोपर राम कदम दहीहंडी – घाटकोपरमध्ये राम कदम यांनी दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, रोहित शेट्टी, सलमान खान, विकी कौशल- कटरीना कैफ, शक्ती कपूर, असराणी, जितेंद्र, जया प्रधा, गणेश आचर्य, टेरेंस लुईस, रेमो फर्नांडिस, सलीम सुलेमान, दानीश गायक, फुकरे टीम, गदर टीम हे कलाकार उपस्थित राहणार आहेत.

घाटकोपर राष्ट्रवादी दहीहंडी – घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनेही दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. या दहीहंडीला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहतील. या हंडीत महिला आणि अंध मुलांचे पथक हंडी फोडणार आहे.

भाजप आणि शिवराज प्रतिष्ठानची दहीहंडी – भाजप आणि शिवराज प्रतिष्ठान मार्फत प्रवीण दरेकर यांनी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते उपस्थित असणार आहेत.

आय सी कॉलनी बोरीवली, भाजप- मुंबईचा बोरिवली पश्चिम परिसरात आय सी कॉलनीत भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडीमध्ये खास आकर्षण म्हणून लावणी आणि भोजपुरी संगीतसुद्धा ठेवण्यात आले आहे.

निष्ठा दहीहंडी, ठाकरे गट – गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही युवा सेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, खासदार या निष्ठा दहीहंडीला उपस्थिती लावणार आहे. दुपारी बारा वाजल्यापासून या निष्ठा दहीहंडी उत्सवाला सुरुवात होईल.

शिवडीतील भाजपची दहीहंडी – शिवडीत भाजपकडून मराठमोळ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार अजय चौधरी यांच्या मतदारसंघात ही दहीहंडी असणार आहे. या दहीहंडीला अनेक राजकीय नेत्यांसह कलाकार हजेरी लावणार आहेत.

ठाण्यातील प्रसिद्ध दहीहंडी

संस्कृती युवा प्रतिष्ठान – प्रताप सरनाईक यांनी यंदाही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे प्रो गोविंदाचे आयोजन केलं आहे. या ठिकाणी विश्वविक्रम करणाऱ्या पथकाला 11 लाख रुपये दिले जाणार आहेत. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर असणार आहेत.

मनसे दहीहंडी ठाणे- मनसेतर्फे ठाण्यात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक 9 थर रचणार आहे. जय जवान गोविंदा पथकाकडून 10 थर रचून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 10 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांच पारितोषिक दिलं जाणार आहे.

टेंभी नाका दहीहंडी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दहीहंडी म्हणून ही हंडी प्रसिद्ध आहे. या दहीहंडीला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अवधूत गुप्ते आणि इतर सेलिब्रिटी या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत.

ठाणे भाजप दहीहंडी (शिवा पाटील)- स्वामी प्रतिष्ठान (शिवाजी पाटील) तर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

संकल्प प्रतिष्ठान, ठाणे (रवींद्र फाटक, रघुनाथ नगर) – दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानाकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. तसेच अनेक बॉलिवूड कलाकार, मराठी सेलिब्रेटी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

ठाण्यात राजन विचारे आयोजित दहीहंडीचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच कॅसल मील चौकात भाजप नेते कृष्णा पाटील यांच्याकडून गोकुळ दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी एकूण 55 लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.

नवी मुंबईतील दहीहंडी – नवी मुंबईत ‘महाराष्ट्राच्या परिवर्तनाची’ प्रतिकात्मक दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य पक्ष उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी हे आयोजन केले आहे.

लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर

मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1 हजार 354 दहीहंडी उत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाण्यात लाखो रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर ठाण्यात टेंभी नाक्याला मुख्यमंत्री शिंदेंची दहीहंडी असून बक्षिसाची रक्कम पुरुषांसाठी 1 लाख 51 हजार, महिलांसाठी 1 लाख आहे. त्याशिवाय प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत 1 लाख रुपयाच्या बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.