मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे (Heavy Rain) काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी (Collector) तसेच जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
पुढच्या काही तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, परभणी, आणि इतर काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पुणे आयएमडीचे के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 5 दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती असणार आहे. मान्सून TROUGH सक्रिय, पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा आणि लगतच्या दक्षिण झारखंड आणि GWBवर. याचा परिणाम महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत पावसाचा इशारा… अशाप्रकारचे ट्विट त्यांनी केले आहे.
कोकणातील चारही जिल्ह्यांना पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे वाहतूक यंत्रणेबरोबरच जनजीवनही विस्कळीत झाले. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला असून संततधार आहे. ठाण्यात दिवसभरात 31 मिली मीटर पावसाची नोंद झाली. काही भागात रस्त्यावर झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सिंधुदुर्ग, आंबोलीत नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी जीवदान दिले. आंबोलीतील हिरण्यकेशी नदीकिनारी सेल्फी घेत असताना या महिलेचा तोल गेला होता. या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. अनेक ठिकाणी दरडी तसेच झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.