मुंबई | 13 जानेवारी 2024 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरोपीने एक पोस्ट टाकली होती. यामध्ये त्याने प्रेम यादव हत्या प्रकरणात ब्राह्मण महासभा आणि मीडियाने त्याचे घर पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, जर घर कोसळले तर योगी यांची हत्या निश्चित होईल असे आरोपीने म्हटले होते. यानंतर रुद्रपूर कोतवाली पोलिसांनी आयपीसी कलम ५०५ (२), ५०६ आणि ६७ आयटी अॅक्ट अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. सायबर सेलला आरोपीचे महाराष्ट्रातील मुंबई हे ठिकाण सापडले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून आरोपीला अटक केली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अजित यादवला देवरिया पोलिसांनी मुंबईतून अटक केली. आरोपी मूळचा भदोही जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुंबईत वडिलांसोबत राहून तो पदवीचे शिक्षण घेत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
अजित यादव याची ‘X’ वरील पोस्ट ३ जानेवारीला व्हायरल झाली होती. यामध्ये देवरियाच्या प्रसिद्ध फतेहपूर हत्याकांडातील न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता. यामध्ये आरोपीने असे लिहिले होते की, प्रेम यादव हत्या प्रकरणात ब्राह्मण महासभा आणि मीडियाने त्याचे घर पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. डीएम कोर्ट नेहमी सरकारला हवा तो निर्णय देते. त्यामुळे हे घर कोसळले तर योगींची हत्या निश्चित होईल. यासाठी माझे आयुष्य पणाला लागले तरी चालेल.
2 ऑक्टोबर 2023 रोजी माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचंद यादव यांची रुद्रपूर कोतवालीच्या फतेहपूर गावातील लेधा टोला येथे हत्या झाली. जमिनीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सत्य प्रकाश दुबे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर प्रेमचंद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे आलिशान वाडा बांधला होता. त्या वादातूनच प्रेमचंद यादव यांची हत्या झाली होती.
पोलीस तपासामध्ये प्रेमचंद यादव यांनी सरकारी जमिनींवर बेकायदा अतिक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले. डीएम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. 30 डिसेंबर 2023 रोजी डीएम कोर्टाने तहसीलदार कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आणि प्रेमचंद यादव यांच्या कुटुंबाचे अपील फेटाळले.
न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ अजित यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिली होती. मात्र, आरोपीचा प्रेमचंद यादव यांच्या कुटुंबाशी कोणताही संबंध नाही असे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी मुंबईतून अजित यादव याला अटक करून त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे.