मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वाचं विधान केलंय. केसरकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पडद्यामागे खरंच काही घडतंय का? अशा चर्चांना उधाण आलंय.
“जी विचारधारा बाळासाहेबांशी जुळत नव्हती त्यापासून उद्धव ठाकरेंना आधी लांब जावं लागेल, तेव्हा गेलेली माणसं पुन्हा परत यायला वेळ लागणार नाही”, असं सूचक विधान दीपक केसरकर यांनी केलं.
“उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारलं नसतं. बाळासाहेब म्हणायचे गर्व से कहो हम हिंदू है. बाळासाहेबांची ही विचारधारा होती”, असं दीपक केसरकर म्हणाले.
“उद्धव ठाकरेंसोबत राहिलेली माणसं ही वैयक्तिक प्रेमापोटी आहेत. त्यांची ती विचारधारा नाही”, असंही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, दिल्ली हायकोर्टात आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. मी गेलाय तीस वर्षांपासून पक्ष सांभाळतोय. त्यामुळे माझ्या वडिलांनी दिलेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह का वापरु शकत नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी वकिलांमार्फत कोर्टात उपस्थित केला.
याबाबत दीपक केसरकरांना प्रश्न विचारला असता त्यांनी पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केला आणि त्यांच्या विचारांवरच चालणार. त्याला दुसरं उत्तर असू शकतं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.