मुंबई: आम्ही आमच्या पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे नाहीत. आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही. तुम्ही म्हणजे कायदा नाही. दीपक केसरकर मला तुरुंगात पाठवण्याची भाषा करत असतील तर 2024 साली त्यांनीही तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी. सर्व तयारी केलीय, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
संजय राऊत यांनी यावेळी संभाजी महाराजांच्या अवमानावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वाद असू नये. महाराष्ट्राच्या इतिहासात या दोन छत्रपतींचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे. इतर राज्यांना भूगोल आहे. तो इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे, असं संजय राऊत म्हणाले.
जे संभाजी महाराजांच्या अपमानावर बोंबा मारत आहेत. ते शिवाजी महाराजांच्या अपमानावर मूग गिळून का गप्प आहेत? राज्यपालांच्या दारावर जाऊन ते आंदोलन का करत नाहीत? राज्यपाल हटावची घोषणा का करत नाही?
राज्यपालांना माफी मागावी असं का सांगत नाही? त्यांचे दुसरे जे दिल्लीतील प्रवक्ते आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यावर का बोलत नाही? असा सवाल राऊत यांनी केला.
संभाजी महाराजांबद्दल आम्हीही भावनाशील आहोत. पण ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्यासाठी मोठा संघर्ष केला. त्या शिवाजी महाराजांचा भाजपच्याच लोकांनी अपमान केला. राज्यपालांनी अपमान केला. त्यावर भाजप आणि सध्याचे मुख्यमंत्री का गप्प आहेत? असा सवालही त्यांनी केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबईत येत आहेत. यावेळी ते राज्यातील काही उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई बिझनेस सेंटर आहे.
आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबई आणि महाराष्ट्राचं योगदान घेत असतील तर त्याला विरोध करण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशचा विकास करायचा असेल तर त्यांनी मुंबईत येण्याबरोबरच गुजरातलाही जावं. एखाद्या राज्याचा मुंबई महाराष्ट्रामुळे विकास होत असेल तर चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणाले.