मुंबई: भाजपच्या नेत्या दिव्या ढोले (divya dhole) यांना पाठवण्यात आलेल्या आक्षेपार्ह मजकूर आणि फोटोवरून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी नवाच संशय व्यक्त केला आहे. स्त्रियांचा अपमान फक्त भाजपाच करू शकते. दिव्या ढोले बदनामी प्रकरणात कदाचीत भाजपा आयटी सेलचा (IT CELL) चा हात असू शकतो? हा वाद पक्षाअंतर्गत राजकारणाचा विषय दिसून येतो. तपास यंत्रणांनी मुंबई भाजप IT CELL च्या कार्यकर्त्यांची चौकशी करावी कदाचित सत्य लवकरच समोर येईल, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. सय्यद यांनी थेट संशयाची सूई भाजपच्या दिशेनेच वळवल्याने तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. दिव्या ढोले यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांना आलेल्या मेसेजबाबत माहिती दिली. तसेच या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. राजकारणात आलेल्या महिलांची अशा प्रकारे मानहानी करणं योग्य नसल्याचंही ढोले यांनी म्हटलं होतं.
स्त्रीयांचा अपमान फक्त भाजपाच करू शकते. दिव्या ढोले बदनामी प्रकरणात कदाचीत भाजपा IT CELL चा हात असु शकतो ? हा वाद पक्षाअंतर्गत राजकारणाचा विषय दिसुन येतो. तपास यंत्रणांनी मुंबई भाजप IT CELL च्या कार्यकर्त्यांची चौकशी करावी कदाचित सत्य लवकरच समोर येईल. @ShivSena @bjpsamvad
— Deepali Sayed (@deepalisayed) June 2, 2022
दिव्या ढोले यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी आपल्याला येत असलेल्या आक्षेपार्ह मजकूराकडे मीडियाचं लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत अश्लील, घाणेरडे संदेश पाठवले जात आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत आपण या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठविण्यात असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव दिव्या ढोले यांनी काल सांगितले होते.
प्रगत महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या महिलांना अशीच वागणूक मिळणार आहे का? हीच राज्यातील महिला सुरक्षितता आहे का? असे सवालही ढोले यांनी यावेळी केले. दीपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले. या विरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये सर्व पुरावे सादर करून दोन वेळा तक्रार नोंदवण्यास गेले होते. पण चौकशीचे व कायदेशीर सल्ल्याचे निमित्त करत एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही तक्रार दाखल केल्यानंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॉर्फ केलेली छायाचित्रे पाठवून मला मानसिक त्रास दिला जात आहे. याबद्दल आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले असून महिला आयोगाकडेही याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.