ठाणे : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत केडीएमसीच्या एका नगरसेवकाकडून 3 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. खडकपाडा पोलिसांनी आरोपी तरुणीला खंडणी घेताना रंगेहात पकडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीने 2 वर्षांपूर्वी याच नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, या गुन्ह्यात नगरसेवकाची निर्दोष सुटका झाली.
आरोपी तरुणी नगरसेवकाच्या कल्याण पश्चिमेकडील कार्यालयात गेली. तेथे तिने नगसेवकाशी चर्चा केली. तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर तिने नगरसेवकांनी दिलेले 3 लाख रुपयांचे बंडल बॅगेत टाकले. त्याआधी तिने कार्यालयातील सीसीटीव्ही बंद करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, माझं कोण काय करणार? असं बोलून ती निघणार तेवढ्यात पोलिसांनी कार्यालयात येऊन तिला अटक केली.
आरोपी तरुणीने 2017 रोजी देखील संबंधित नगरसेवकाविरोधात बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. काही महिन्यांपूर्वीच या नगरसेवकाची त्यातून निर्दोष सुटका झाली. त्यानंतर ही तरुणी त्यांना परत बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होती. तसेच पैशांची मागणी करत होती. त्यामुळे नगसेवकाने याबाबत खडकपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी या तरुणीला रंगेहात अटक केली.
पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. एकीकडे महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कायदे कठोर केले जात आहेत. तर दुसरीकडे अशाप्रकारे कायद्याचा दुरुपयोग होतानाही पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे आहे.